पुणे, ता. २१ : ‘‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टांग कोणी कोणाला मारली, यावरून चर्चेचा धुराळा उडविणाऱ्यांमध्ये बिनालंगोट पहिलवानच आघाडीवर आहेत. ज्यांना कुस्तीचा खेळ कळतो, त्यांनीच त्याविषयी बोलावे. खेळाचे राजकारण करू नका, कुस्ती हा खेळ प्रत्येक मल्लाचा धर्म असतो, त्यावर चर्चेचा धुराळा उडवून अशा खेळाला जातीय रंग देऊ नका’’ अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कुस्ती स्पर्धेतील निकालावरुन रान पेटविणाऱ्यांना फटकारले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने ‘हिंदकेसरी’ स्पर्धेचे विजेते पहिलवान अभिजित कटके व ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे विजेते शिवराज राक्षे यांचा अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला. या वेळी कटके व राक्षे यांना पवार यांच्या हस्ते बुलेट दुचाकी भेट देण्यात आली. तसेच ‘उपमहाराष्ट्र केसरी’ पहिलवान महेंद्र गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला. यासह सिंहगड रस्ता परिसरात कोयता घेऊन दहशत पसविणाऱ्यांना पकडणाऱ्या पोलिस कर्मचारी अक्षय इंगवले व धनंजय पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, दिलीप मोहिते, अशोक पवार उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘कुस्ती स्पर्धेवरील चर्चेमुळे चांगली कामगिरी करणाऱ्या मल्लांची कामगिरी झाकोळली जाता कामा नये. सिकरंद शेख हाही लढवय्या मल्ल आहे. त्याचबरोबर महेंद्र गायकवाड याचे कष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. अभिजीत कटके, शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड या खेळाडुंनी आपले घर, तालीम, वस्तादांचे नाव मोठे केले आहे. खेळामध्ये राजकारण करू नका. त्याला जातीय स्वरुप देण्याचा प्रयत्न करू नका.’’
‘‘खेळाडुंनी अपयश आल्यावर खचून जाऊ नये आणि यश मिळाल्यावर हुरळून जावू नये. शिवराज, अभिजीत, महेंद्र यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून आणावे, ऑलिम्पिकमध्ये आपल्या राष्ट्रगीताची धून त्यांनी ऐकण्याची संधी देत अंगावर तिरंगा घ्यावी, अशी आमची इच्छा आहे. सरकार बदलत असतात, मात्र खेळामध्ये राजकारण आणणार नाही.’’ असेही पवार यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक प्रशांत जगताप यांनी केले.
पहिलवान भलतेच ताकदवान आहेत
‘‘शिवराज व अभिजीत या दोघांनाही बुलेट मोटारसायकल भेट देण्यात आली आहे. मी त्यांना विचारले, तुम्हाला बुलेट चालविता येते का? तेव्हा त्यांनी आम्हाला बुलेट चालविता येत नसल्याचे सांगितले, मग बुलेट नेणार कशी? असा प्रश्न मी त्यांना विचाला. तेव्हा बुलेट उचलून घेऊन जाऊ, असे दोघांनी सांगितले. त्यामुळे आपले पहिलवान किती ताकदवान आहेत, हे तुम्हाला कळालेचं असेल, असे अजित पवार यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षावर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभिजीत कटके यांना ६ लाख रुपये, बुलेट, शिवराज राक्षे यांना २ लाख रुपये व बुलेट, महेंद्र गायकवाड यांना एक लाख रुपये तसेच पहिलवान किरण भगत यांना एक लाख रुपये या वेळी बक्षीस स्वरुपात देण्यात आले.
़ १९८३८,१९८३९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.