पुणे, ता. १५ : विद्येच्या माहेरघरात रंगणारा पुस्तकांचा महामेळा म्हणजेच पुणे पुस्तक महोत्सव. या महोत्सवानिमित्त आदल्यादिवशी ‘ज्ञानसरिता ग्रंथ दिंडी’ काढण्यात आली. ढोल-ताशा, टाळ मृदुंग, शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग अशा उत्साहपूर्ण वातावरणात ही ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीनिमित्त पुणे पुस्तक महोत्सवाची नांदी झाली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे शनिवारपासून (ता. १६) पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर २४ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. महोत्सवाच्या पूर्वदिनी गरवारे महाविद्यालय ते फर्ग्युसन महाविद्यालय यादरम्यान ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यात तीस महाविद्यालयांतील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केल्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ग्रंथदिंडीला झेंडा दाखवला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले, श्याम भुर्के, श्यामा घोणसे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस, डॉ. सुनील भंडगे या वेळी उपस्थित होते.
पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथ असलेल्या पालख्या खांद्यावर घेतल्या होत्या. तसेच वाचनाचे महत्त्व, महापुरुषांचे विचार सांगणारे फलक हाती घेतले होते. यात विविध महापुरुषांच्या नावे असणाऱ्या दिंडीचा समावेश होता.
बालवाचकांची दिंडी
लोकसेवा ई-स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘चला चला रे वाचू आपण पुस्तक, ज्ञाना पुढे होऊ नतमस्तक’ असा संदेश देत बालभारती ते फर्ग्युसन महाविद्यालय या मार्गे बाल साहित्य दिंडी काढली. यात साहित्यिक ल. म. कडू, राजीव तांबे, कवयित्री डॉ. संगीता बर्वे, बालकलाकार शर्व गाडगीळ, लेखिका आराध्या नंदकर, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका चैत्राली जैन, ‘संवाद पुणे’चे सुनील महाजन उपस्थित होते. ढोल-लेझीम पथक, पालखीसह सुमारे पाचशे शालेय विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते. ‘‘सध्याच्या धावपळीच्या काळात स्थिर, शाश्वत जीवन जगता यावे, यासाठी वाचन आवश्यक आहे,’’ असे मत कडू यांनी मांडले.
पुस्तके समाजाला आणि जीवनाला जोडतात. त्यामुळे मुलांना पुस्तक वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे औचित्य साधून काढलेल्या या दिंडीतील वारकरी पुणे पुस्तक प्रदर्शनाचे ‘ब्रॅण्ड ॲम्बेसिडर’ आहेत.
- युवराज मलिक, संचालक, राष्ट्रीय पुस्तक न्यास
(फोटो : शहाजी जाधव देणार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.