पुणे, ता. १७ : पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचा वापर टाळण्यासाठी आणि शाडूमातीच्या मूर्तीपेक्षाही वजनाला हलकी असणारी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी अनोखे मिश्रण तयार केले आहे. विशेष म्हणजे या मिश्रणासाठी त्यांना ‘पेटंट’देखील मिळाले आहे. अशा पद्धतीचे ‘पेटंट’ मिळविणारे ते पहिलेच शिल्पकार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या मिश्रणाला त्यांनी वडिलांचे नाव दिले असून ‘रवींद्र मिश्रण’ या नावाने पेटंट मिळाले आहे. याबाबतची माहिती धोंडफळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मिश्रण पाण्यात टाकल्यानंतर विरघळण्याचा कालावधी, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यासह अनेक बाबींच्या चाचण्या घेण्यात आल्या. जुलै २०१९ मध्ये ‘पेटंट’साठी नोंदणी केली होती. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर नुकतेच पेटंट मिळाले. कोणत्या घटकापासून बनवलेली मूर्ती घ्यायची, असा प्रश्न अनेकांना दरवर्षी पडतो. शाडूची मूर्ती वजनाला जड असते, तर ‘पीओपी’च्या मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया केली असल्याने त्यांचे पाण्यात विरघळणे सहज शक्य नसते. मात्र ‘रवींद्र मिश्रणा’पासून तयार केलेली ‘गणेशमूर्ती’ खऱ्याअर्थाने पर्यावरणपूरक आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मिश्रणात या घटकांचा वापर
- गाळाची माती
- शाडूमाती
- भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा
मिश्रणाची वैशिष्ट्ये
- पूर्णतः रसायनविरहित
- विसर्जन केल्यानंतर माती झाडांसाठी वापरता येते
- दणकट मूर्ती तयार होते
- तयार झालेल्या मूर्तीचे वजन कमी असते
- शाडूमातीच्या मूर्तीपेक्षा ही मूर्ती लवकर सुकते
- मूर्तीवर कोणत्याही प्रकारचे रंगकाम करता येते
आजोबांनी १९५५ मध्ये कागदी लगद्यापासून केलेली मूर्ती अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. वडील रवींद्र यांचेही पर्यावरणपूरक लगद्याचे अनेक गणपती पुण्यात आणि पुण्याबाहेर गेले आहेत. यातूनच प्रेरणा घेत मी एका नवीन मिश्रणाच्या अभ्यासास सुरुवात केली. या मिश्रणावर अनेक प्रयोग केले गेले. त्यानंतर आम्ही ‘पेटंट’साठीची प्रक्रिया सुरू केली.
- अभिजित धोंडफळे, शिल्पकार
PNE23T62110
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.