पुणे, ता. १ ः विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर उमेदवारांकडून छुप्या प्रचाराला वेग आला. शेवटच्या काही तासांत ज्या भागात मतदान कमी होणार आहे तेथे राजकीय डावपेच खेळून वातावरण अनुकूल करण्याचा प्रयत्न केला गेला. तर दुसरीकडे मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची फळी तयार असून जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी उमेदवारांनी तयारी केली आहे. त्यासाठी मतदान चिठ्ठी वाटप, वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे शहरात कसबा, पर्वती, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी या आठ विधानसभा मतदारसंघासाठी उद्या (ता. २०) सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे. त्यापूर्वी सोमवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजता प्रचार थांबलेला आहे. त्यामुळे मतदानाला सुरुवात होईपर्यंतचे ४८ तास राजकीय पक्ष, उमेदवारांसाठी महत्त्वाचे आहेत.
पुणे शहरातील मतदारसंघांमध्ये निवडणूक अटीतटीची होणार आहे. त्यामुळे निकाल काय लागणार याबाबत उमेदवार, कार्यकर्ते यांच्यामध्ये धाकधूक आहे. मतदानानंतर विजयाची खात्री यावी यासाठी योग्य पद्धतीने मतदान करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व पक्षिय उमेदवारांनी त्यांची मतदार केंद्रनिहाय यंत्रणा लावली आहे. कार्यकर्त्यांकडे लॅपटॉप, मतदानाची चिठ्ठी देणारे मशिन देण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिवसभरात ज्या भागात चिठ्ठ्या पोहोचल्या नाहीत अशा ठिकाणी चिठ्ठ्यांचे वाटप सुरू ठेवले होते.
याकडे देणार लक्ष
१) प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यानंतर प्रत्येक तासाची आकडेवारी संकलित करून कोणत्या भागात किती मतदान झाले आहे?
२) कोणत्या भागातील मतदार बाहेर पडला आहे?
३) ज्या भागात मतदान कमी आहे, तेथील मतदराना मतदानासाठी बाहेर काढणार
४) ज्या भागांत अनुकूल मतदान होणार आहे, तेथील मतदारांना सकाळी अकराच्या आधी मतदान करून घेण्यावर भर
५) त्यानंतर अन्य भागांतील मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न असणार
नाराजांची मनधरणी
विधानसभा निवडणुकीत काही पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिले. ते विरोधात मतदान करणार नसले तरी त्यांनी मतदान वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत. अशा कार्यकर्त्यांनी उमेदवार व त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांकडून संपर्क करून नाराजी दूर करण्यासाठी मनधरणी सुरू केली. नाराजी दूर करून शेवटच्या दिवशी मदत करावी अशी गळ घालण्याचा प्रयत्न केला गेला.
प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हालचालीवर लक्ष
निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर छुपा प्रचार सुरू होतो. यामध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी लपून छपून कार्यकर्ते फिरत असतात. यापूर्वी निवडणुकीमध्ये यावरून आरोप प्रत्यारोपही झालेले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराचे कार्यकर्ते, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाते. पैसे वाटताना कार्यकर्ते सापडल्यास ते प्रकरण निस्तारताना उमेदवाराची चांगलीच डोकेदुखी होते, तसेच बदनामी होऊन त्याचा परिणाम मतदानावर होतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांवर लक्ष ठेवले जाते.
स्थलांतरित मतदारांसाठी वाहन व्यवस्था
कसबा मतदारसंघात स्थलांतरित झालेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. येथील मतदार कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, कोंढवा या भागात राहाण्यासाठी गेलेले आहेत. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी आहे. अशा मतदारांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क शाधला जात आहे. मतदानाला घेऊन घेण्यासाठी व परत घरी सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली आहे.
अशी आहे तयारी
- मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची फळी
- प्रत्येक मतदान केंद्रात उमेदवाराचा प्रतिनिधी नियुक्त
- सकाळी अकराच्या आधी हक्काचा मतदार बाहेर काढण्यावर भर
- मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांकडे मतदार यादी, मतदानाची चिठ्ठी
देण्यासाठी मशिन
- प्रत्येक तासाला मतदानाच्या टक्केवारीचा आढावा घेऊन मतदान वाढविण्याचे प्रयत्न
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.