पुणे, ता. १९ : क्षयरोग (टीबी) रुग्णाच्या कुटुंबीयांनाही भविष्यात क्षयरोगाची शक्यता आहे का, हे पाहण्यासाठी क्षयरोग विभागाने महिनाभरापासून नवीनच ‘सीवाय-टीबी’ ही चाचणी सुरू केली आहे. ही चाचणी जर सकारात्मक आली, तरच त्यांना क्षयरोग प्रतिबंधात्मक औषधे देण्यात येतात. अन्यथा त्यांना विनाकारण औषधे घेण्याची गरज पडत नाही. महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात ही चाचणी करण्यास सुरुवात झाली असून, पुणे शहरात आतापर्यंत याच्या ५३ तपासण्या केल्या आहेत. त्यापैकी १२ तपासण्या सकारात्मक आल्याने त्यांना क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले आहेत.
फुप्फुसाचा क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने एखाद्या रुग्णाचे निदान झाल्यास त्या रुग्णाच्या घरातील इतर सदस्यांनाही क्षयरोग होण्याची दाट शक्यता असते. म्हणून याआधी नवीन क्षयरोगी (फुप्फुसाचा) रुग्णाचे निदान झाले की, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना त्याची लक्षणे आहेत का, हे पाहून लक्षणे असतील, (दोन आठवड्यांपेक्षा अधिक खोकला, वजन कमी होणे, हलकासा ताप) तर त्यांची क्षयरोगाची चाचणी करून औषधे देतात. परंतु, बहुतांशवेळा काही सदस्यांना क्षयरोगाची लागण झालेली असते. मात्र, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना क्षयरोगाची लक्षणे दिसत नाहीत. त्याला सुप्तावस्थेतील क्षयरोग असे म्हणतात. म्हणून पुढे त्यांनाही क्षयरोग होऊ शकतो. हा सुप्तावस्थेतील क्षयरोग आहे का, हे पाहण्यासाठी आधी कोणतीच चाचणी नव्हती.
दरम्यान, क्षयरोग विभागाने आता त्यासाठी ऑक्टोबरपासून ‘सीवाय-टीबी’ ही चाचणी सुरू केली आहे. ही चाचणी नवीन क्षयरोगी रुग्णाच्या कुटुंबीयांवर करता येते. ती सकारात्मक आली, तरच त्यांना क्षयरोग प्रतिबंधात्मक औषधांचा डोस सुरू करण्यात येतो. तो आठवड्यातून एकदा असे बारा डोस घ्यावे लागतात. जर चाचणी नकारात्मक आली, तर त्यांना कोणतेही औषधे घेण्याची गरज पडत नाही. म्हणून आता त्यांना पूर्वीसारखी सरसकट औषधे घेण्याची गरज नाही.
काय आहे ‘सीवाय-टीबी’ चाचणी?
‘सीवाय-टीबी’ हे औषध पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केले आहे. १८ वर्षांपुढील नागरिकांवर त्याचे ०.१ मिली औषध इंजेक्शनद्वारे डाव्या हातावरील त्वचेच्या खाली टोचले जाते. टोचलेल्या जागेची ४८ तासानंतर तपासणी केली जाते. तेथे जर त्वचेला गांधी उठल्यास त्याचे प्रमाण किती आहे, ते पाहूनच त्यांना क्षयरोग प्रतिबंधात्मक डोस सुरू केला जातो. हा डोस प्रतिबंधात्मक असून, क्षयरोगी रुग्णांच्या औषधांपेक्षा वेगळा असतो.
फुप्फुसाचा क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. त्यानुसार नवीन रुग्णांच्या सहवासातील सदस्यांची ‘सीवाय-टीबी’ चाचणी करण्यात येत असून, त्यामध्ये चाचणी सकारात्मक आल्यास त्यांना प्रतिबंधात्मक औषधे सुरू करता येतात. संपूर्ण महाराष्ट्रात ही चाचणी सुरू केली आहे. क्षयरोगी आढळलेल्या घरातील नागरिकांनी त्याची चाचणी करण्यास व क्षयरोगाचे निर्मुलन करण्यासाठी सहकार्य करावे.
- डॉ. संदीप सांगळे, सहसंचालक, क्षयरोग व कुष्ठरोग, महाराष्ट्र राज्य
पुणे महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडून ‘सीवाय-टीबी’ ही चाचणी सुरू केली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ अखेर सरकारी विभागांतर्गत २६१९ आणि खासगी विभागांतर्गत ३३९६ असे एकूण ६०१५ क्षयरुग्णांचे निदान झाले. मजूर अड्डा, बांधकाम ठिकाणे, सार्वजनिक मंडळे इत्यादी ठिकाणी शिबिर घेऊन आणि जोखीमग्रस्त भागात सर्व्हे करून जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांची तपासणी मोफत करण्यात येत आहे.
- डॉ. प्रशांत बोथे, क्षयरोग अधिकारी, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.