पुणे, ता. १९ : राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. पुणे शहरातील किमान तापमानात झपाट्याने घट झाली असून, गारठा वाढला आहे. पुणेकरांना मंगळवारी थंडीचा कडाका जाणवला. सरासरीपेक्षा जास्त असलेल्या किमान तापमानाचा पारा आता पुन्हा घसरला आहे. मंगळवारी (ता. १९) शहरात १२.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली, तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परिसरात ११.६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली घसरले आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, थंडीचा कडाका शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सरासरीपेक्षा किमान तापमानात दोन अंशांची घट झाल्याने थंडीचा कडाका जाणवत होता. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पावसाचे सावट होते. काही भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. मात्र आता मात्र पावसासाठीची परिस्थिती निवळली आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा थंडी सुरू झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिम महाराष्ट्रातही तो जाणवत आहे. एकाच दिवसात किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. शहरात बुधवारी (ता. १९) किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहून कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उपनगरात पारा घसरला
शिवाजीनगर, एनडीए, पाषाण, हवेली या भागातील किमान तापमानाचा पारा १३-१४ अंशांवर नोंदवला जात आहे. काही भागांत किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसइतके आहे. ठराविक अंतरावर किमान तापमानात बदल जाणवून येत आहे.
पुण्यातील किमान तापमान
विभाग अंश सेल्सिअस
पुणे - १२.९
पाषाण - १३.३
लोहगाव - १५.१
चिंचवड - १८.१
लवळे - १६.९
मगरपट्टा - १८.८
एनडीए - ११.६
कोरेगावपार्क - १६.९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.