पुणे, ता. २४ : विधानसभा निवडणुकीत पुणे शहरात महायुतीची कामगिरी चांगली राहिली. आठपैकी सात जागांवर महायुतीला विजय मिळाला. निकालाचे औसुक्य संपल्यानंतर आता सत्तास्थापन आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत पुण्याचा समावेश होणार का, झाला तर मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिपद या वेळीही निश्चित मानले जात आहे.
महायुतीच्या जागावाटपात पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले होते. या सहाही मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यात पर्वतीमधून माधुरी मिसाळ आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर हे चौथ्यांदा, तर कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे कँटोन्मेंटमधून सुनील कांबळे हे दुसऱ्यांदा विजयी झाले. कसब्यातून हेमंत रासने हे पहिल्यांदाच विजयी झाले. सध्या तरी शहरातून पाटील यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार, हे निश्चित मानले जात आहे. मिसाळ आणि कांबळे या दोन्ही दावेदारांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत माधुरी मिसाळ यांचे नाव आघाडी होते. परंतु ऐनवेळी मुंबईतील विद्या ठाकूर यांना संधी देण्यात आली. तेव्हापासून मिसाळ प्रतीक्षेत आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर अडीच वर्षांत सत्तेची समिकरणे बदलली आणि महायुतीच्या माध्यमातून भाजप पुन्हा सत्तेवर आली. त्या वेळी पुण्यातून चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तेव्हाही मिसाळ यांना राज्यमंत्रिपद मिळणार अशी जोरदार चर्चा होती. परंतु ती अखेरपर्यंत चर्चाच राहिली. तशीच काहीशी परिस्थिती कँटोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांच्याबाबतीत घडली. एसी-एसटीमधून त्यांना संधी मिळणार अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र त्यांनाही संधी मिळाली नाही.
२०१४ मध्ये पहिल्या यादीत पुण्याला स्थान मिळाले नव्हते. तशीच काहीशी परिस्थिती यंदाही राहण्याची शक्यता पक्षातील काही नेत्यांनी बोलून दाखविली आहे. चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. मात्र गेली दहा वर्षे प्रतीक्षेत असलेल्या आणि चौथ्यांदा निवडून आलेल्या मिसाळ यांना या वेळेस पक्षाकडून नक्की संधी मिळेल, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. पश्मिच महाराष्ट्रात एसी-एसटी प्रवर्गातून कांबळे हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे कांबळे यांना संधी मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.