पुणे, ता. ७ ः लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह गणेशोत्सव, दिवाळीसारखे सण-उत्सव संपूनही शहराच्या अनेक भागांत अनधिकृत फ्लेक्स, बॅनर कायम आहेत. विशेषतः राजकीय नेत्यांचे अभिनंदन करणारे असंख्य अनधिकृत फ्लेक्स, बॅनर ठिकठिकाणी लटकलेल्या अवस्थेत असल्याने पुणे शहर आणखी विद्रूप झाले आहे. किरकोळ विक्रेते, अभ्यासिका, हॉटेल यांची जाहिरात करणाऱ्या अनधिकृत फ्लेक्स, बॅनरकडे महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याची सद्यःस्थिती आहे. वेठीस धरणाऱ्या या फ्लेक्सबाजीवर कारवाईसाठी महापालिकेला मुहूर्त केव्हा मिळणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
मागील सुमारे सात महिने निवडणुकांचे वातावरण होते. याशिवाय गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळीसारखे सण झाले. या वातावरणात राजकीय पक्ष, विविध संस्था-संघटनांनी अनेक कार्यक्रम, उपक्रम राबविले. याच्याशी संबंधित अनधिकृत फ्लेक्स, बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले होते. निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन सरकारही स्थापन होत आहे. सण-उत्सवही आता संपले आहेत, मात्र अजूनही मध्यवर्ती भागांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर कायम आहेत.
आमदार, खासदार, मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन करणारे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर प्रमुख रस्त्यांवरील चौकांसह गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. पेठा, कोथरूड, हडपसर, कर्वे रस्ता, शिवाजीनगर, खडकी, बोपोडी, वारजे माळवाडी, कर्वेनगर, धायरी, कात्रज, धनकवडी, हडपसर, बिबवेवाडी, उत्तमनगर, शिवणे अशा विविध ठिकाणी फ्लेक्सबाजीद्वारे विद्रूपतेत भरच पडली आहे. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागासह क्षेत्रीय कार्यालयांनाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
---
या व्यवसायांचे फलक
चहा
वडापाव
बर्गर
बिर्याणी
हॉटेल
रेस्टॉरंट
व्यायामशाळा
स्थानिक बांधकाम प्रकल्प
अभ्यासिका
खासगी शिकवणी वर्ग
---
येथे लावले जातात फ्लेक्स
झाडे
सिग्नल
उंच इमारती
उड्डाणपूल
मेट्रोचे खांब
बॅरिकेड्स
---
पादचारी, वाहनचालकांना फटका
पदपथांवरच अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावण्यात आल्याने पादचाऱ्यांना त्यांचा अडथळा पार करताना जीव मुठीत धरावा लागतो. अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबावरच अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लटकत असल्याने वाहनचालकांना फटका बसतो. यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
------------
महापालिका शहराच्या वेगवेगळ्या भागांत रोज अनधिकृत फ्लेक्स, बॅनर फलकांबाबत कारवाई करते. रोजच्या बैठकांतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. ज्या भागात फ्लेक्स, बॅनर आहेत ते काढण्यास तत्काळ सांगितले जाईल.
- प्रशांत ठोंबरे, प्रमुख, आकाशचिन्ह विभाग, पुणे महापालिका
-----
कडक दंडात्मक कारवाई केली तरच अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावणाऱ्यांवर वचक बसेल; अन्यथा रोज नवे फ्लेक्स, बॅनर लागतील. असे फ्लेक्स, बॅनर काढण्यात आल्याचे महापालिका रोज सांगेल, मात्र त्यामुळे शहर विद्रूप व्हायचे थांबलेले नसेल.
- विकास करंजकर, नागरिक
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.