पुणे, ता. ७ ः महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील प्राण्यांची शवदाहिनी बंद पडल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील दाहिनीमध्ये प्राण्यांचे दहन केले जात होते. पण त्यामुळे परिसरातील रहिवासी भागात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने तेथील दहन थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पुणे शहरातील मृत प्राण्यांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दाहिनीत दहन केले जाणार आहे.
पुणे शहरात लहान- मोठे असे मिळून रोज सरासरी १० ते १२ प्राण्यांचा मृत्यू होतो. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नायडू रुग्णालयाच्या परिसरात विद्युत विभागाने दाहिनीची व्यवस्था केली आहे. वर्षभरात या ठिकाणी किमान सहा ते साडेसहा हजार प्राणी जाळले जातात. या दाहिनीतील विटांचे बांधकाम असलेला भाग खराब झाल्याने तातडीची दुरुस्ती करण्यासाठी येथील दहन १५ दिवसांसाठी थांबविण्यात आले. पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार प्राणी संग्रहालयातील दाहिनीत प्राणी जाळण्यास परवानगी दिली. तेथे गेले काही दिवस प्राणी जाळले जात होते, पण त्यामुळे परिसरात धुराचे व दुर्गंधीचे प्रमाण वाढल्याने स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी तक्रारी केल्या. तसेच प्राणी संग्रहालयानेही थेट आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना पत्र लिहून प्राणी संग्रहालयातील दाहिनीचा वापर थांबविण्याची मागणी केली. आयुक्तांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आज प्राणी संग्रहालयात बाहेरचे प्राणी जाळू नयेत, प्राणी संग्रहालयाच्या नियमाचे पालन करा असे आदेश दिले आहेत.
आयुक्तांच्या आदेशानुसार प्राणी संग्रहालयातील दाहिनीत प्राणी दहन करण्याचे काम थांबविण्यात आले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून पिंपरी चिंचवड येथील दाहिनीत मृत प्राणी पाठवले जातील. तसेच विद्युत विभागाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुढील काही दिवसांत नायडू रुग्णालयातील प्राणी दाहिनी सुरू होईल.
-डॉ. नयना बोराडे, आरोग्य प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.