पुणे

कोंडीत अडकण्याचा छळ कधी थांबणार?

CD

पुणे, ता. ७ : घरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही तासभर वाहतूक कोंडीत अडकत आहोत, कामाच्या ठिकाणी जाण्यास उशीर होत आहे. रस्त्यावर खड्डे, अतिक्रमण आहे. डंपर, सिमेंटचे मिक्सर, मोठे क्रेन याची बिनधास्त वाहतूक सुरु आहे, दुचाकीस्वारांसाठी तर रस्ता प्रचंड धोकादायक झाला आहे. वाहतूक पोलिस नसल्याने वाहतूक अनियंत्रित आहे. वर्षानुवर्षे अशा प्रकारे आमचा छळ सुरु आहे. महापालिका प्रशासन, पोलिस आणि लोकप्रतिनिधींचे डोळे कधी उघडणार? असा सवाल सिंहगड रस्त्यावरील रहिवाशांनी केला आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ‘सकाळ’ने मालिका प्रकाशित करून हा प्रकार चव्हाट्यावर मांडला. त्यास वाचकांनी चांगला प्रतिसाद देत त्यांचे म्हणणे ‘सकाळ’कडे मांडले आहे. सिंहगड रस्त्यावर वाहतुकीचे कशा पद्धतीने तीन-तेरा वाजले आहेत, हे नागरिकांनीसुद्धा चव्हाट्यावर आणले आहे. संतोष हॉल चौक ते हिंगणेच्या दरम्यान भरपूर वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळेत तर प्रचंड हाल होत आहेत. पण तेथे एकही वाहतूक पोलिस, वॉर्डन नसल्याने कोंडी सुटत नसल्याचे आदित्य हुल्याळकर यांनी सांगितले. गिरीश शहा, मंगेश गवळी, दर्शना इनामदार आदींसह अनेक नागरिकांना या प्रश्नाविषयी परखड भाष्य केले.

रस्त्यांची अवस्था अतिशय घाणेरडी, बेशिस्त वाहनचालक, डंपर, सिमेंटची वाहतूक करणारे ट्रक यांची मोठी वर्दळ आहे. दुचाकी चालविताना हा रस्ता धोकादायक वाटतो. बेशिस्त वाहनचालक कुठूनही वाहने चालवतात, पण पोलिस त्यावर कारवाई करत नाहीत. राजाराम पुलापासून संतोष हॉलकडून सनसिटीपर्यंत जायला सात ते आठ मिनीटे लागत होते. आता अर्धा तास लागतो.
- मेघना सहस्रबुद्धे

शहराचा वाढता विस्तार हे प्रशासनासाठी केवळ महसूल उत्पन्नाचे साधन नसून योग्य सुविधा पुरविणे व व्यवस्थापन राखणे ही सुद्धा जबाबदारी असते. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधींना फारसा रस नाही. त्यामुळे भोग भोगणे जनतेला अपरिहार्य झाले आहे. ही सामुहीक जबाबदारी असल्याने दाद कोणाकडे मागावी, हा जनतेचा संभ्रम आहे.
- प्रशांत उमरदंड

मी नांदेड सिटीमध्ये राहायला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नांदेड, धायरी, वडगाव आणि वारजे परिसरात धूळ व प्रदूषण वाढले आहे. सिंहगड रस्त्यावर वाळू आणि खडी पडली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे अपघात होत आहेत. पुणे महापालिकेकडे पीएमसी केअरवर यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. अधिकारी, लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली पाहिजे.
- संकेत गुजर

सिंहगड रस्त्यावरील पुलाचे काम तीन वर्षापासून सुरू आहे. वाहतुकीची कोंडी हा नित्याचा भाग झाला आहे. रस्त्यावरील अतिक्रमण व बेशिस्त, अनियंत्रित वाहतुकीमुळे रस्त्यावर वाहने चालवणे अवघड झाले आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने दुचाकी चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे.
- राजेंद्र परदेशी


सगळे मलिदा खाण्यात मग्न
पुणे महापालिका, वाहतूक पोलिस, उड्डाणपुलाचे काम करणारे अधिकारी यांना लोकांचे काहीही पडलेले नाही. या रस्त्यावर ही वरील मंडळी कधीही दिसत नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळत नाही. सर्वात जास्त हाल शालेय विद्यार्थ्यांचे होत असून, शाळेत जाताना उशीर, घरी परत येतानाही उशीरच होत आहे. पण नागरिकांना दिलासा कोण देणार? सगळे मलिदा खाण्यात मग्न असल्याचा आरोप महादेव महाजन यांनी केला आहे.

अनधिकृतपणे आरएमसी प्लांट
मी गेली ३२ वर्षे माणिक बागेत आणि आता प्रयेजा सिटी येथे राहात आहे. या परिसरात अनधिकृतपणे सात ते आठ आरएमसी प्लांट आहेत. त्यातील काही लोकप्रतिनिधींचे आहेत. सिमेंट घेऊन जाणाऱ्या गाड्या, डंपरची बेसुमार वाहतूक कायम सुरु असते. रस्त्यावर पडलेली खडी, सिमेंटमुळे धुळीचे प्रमाण प्रचंड आहे. अवजड वाहतुकीमुळे आत्तापर्यंत अनेक अपघातही झाले आहेत. वाहतुकीच्या कोंडीमुळे शरद रुग्णालय ते प्रयेजा सिटी हे अंतर कापण्यास कधी-कधी ३० ते ४० मिनिटे लागतात. मात्र, प्रशासन आणि राज्यकर्ते ढिम्म असल्याचा आरोप आनंद खळदकर यांनी केला आहे.


नागरिकांचे म्हणणे...
१) धायरीमध्ये कालव्याच्या बाजूला असंख्य आरएमसी प्लांट आहेत. ते दिवसा तसेच रात्रीही सुरु असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास होतो. पण, अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत.
२) धायरी फाटा ते डीएसके चौकादरम्यान तीन किलोमीटर अंतर कापण्यासाठी गर्दीच्या वेळी एक ते दीड तास लागतो. या रस्त्यावर दुभाजक असणे आवश्‍यक आहे. सध्या हा रस्ता धोकादायक झाला आहे.
३) उड्डाणपुलाच्या कामामुळे फनटाइम थिएटर, हिंगणे, विठ्ठलवाडी या ठिकाणी रोजच कोंडी होते. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. कालवा रस्त्यावर रोजच बाजार भरत असल्याने तेथेही वाहतूक कोंडी होते.
४) वडगाववरून राजाराम पुलाकडे जाताना हिंगणे येथे पूल उतरविल्याने राजाराम ते वडगावकडे जाणाऱ्या बाजूची लेन फारच छोटी झाली आहे. तेथील रोहित्र हलविल्याशिवाय गर्दी कमी होणार नाही. हिंगणे येथील मॉलमध्ये येणारे लोक रस्त्यावरच वाहने लावतात.
५) सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम कित्येक वर्षे सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण, वेळेचा अपव्यय होत आहे. हे सहन करणं म्हणजे सामान्य नागरिकांचा छळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT