पुणे, ता. ७ ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चरल (एमसीसीआयए), अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय, कृषी व प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) यांच्या वतीने ‘क्वालिटी आणि फूड सेफ्टी लीडरशिप समिट २०२४’चे ‘एमसीसीआयए’ टॉवर येथे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात अन्नप्रक्रिया आणि अन्नसुरक्षा उद्योगातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. परिसंवादात अन्नसुरक्षा, गुणवत्ता मानके आणि त्याच्याशी निगडित विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी अन्न उद्योगातील १५६ मान्यवरांनी सहभाग नोंदविला आणि विविध विषयांवर तज्ज्ञांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचा उद्देश तज्ज्ञ आणि उद्योगपतींना एकाच व्यासपीठावर आणून चर्चा घडविणे हा होता. या वेळी अनेक मान्यवर वक्त्यांनी आपली मते मांडली. यात ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर, ‘एमसीसीआयए’च्या अन्नप्रक्रिया समितीचे अध्यक्ष आनंद चोरडिया, कृषी प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे, ‘अपेडा’चे संचालक तरुण बजाज आदींनी मार्गदर्शन केले.
मान्यवरांनी चर्चेत देशातील खाद्यपदार्थ, त्यांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि नियमनासाठीच्या आवश्यकता यावर भर दिला. या वेळी खाद्यप्रक्रिया उद्योगाला लवचिकता आणि बळकटी आणण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना, दृष्टिकोन याबाबत ऊहापोह झाला. या वेळी विविध सत्रांत अन्नप्रक्रिया उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आलेली क्रांती, तसेच नवनवीन डिझाईन तत्त्वे, नवीन आव्हानांवर भाष्य केले गेले. या विषयांवर आयआयटी दिल्लीतील डॉ. काव्या दशोरा, कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक तज्ज्ञ अमित जाधव यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यांत खाद्यपदार्थांबाबतच्या स्वच्छतेपासून विविध विषयांवर चर्चा झाली. शेफ मनजित गिल, फेरेरो इंडियाचे देशराज शर्मा यांनी मते मांडली. उद्योगांव्यतिरिक्त अन्नप्रक्रियाविषयक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम शिकविणाऱ्या विविध संस्थांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनीही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेतला.
उद्योगांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न...
सतत बदलत असणाऱ्या जगातील बाजारपेठेसाठी भारतीय उद्योगांना प्रोत्साहित करणे, हे आपले उद्दिष्ट असल्याचे ‘एमसीसीआयए’च्या वरिष्ठांनी नमूद केले. ‘अन्नपदार्थांची निर्यात आणि त्यातील आव्हाने’ या विषयावरील सत्राचे संचालन स्मिता मूर्ती यांनी केले. या विशेष सत्रात जागतिक अन्नसुरक्षा मानांकने, त्याचे नियम आणि नियमपालन, तसेच स्थानिक उद्योगासमोरील प्रश्न यांवर चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.