पुणे, ता. ११ ः शहरातील रस्त्यांवर धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने एक कोटी २ लाख रुपये खर्च करून घेतलेल्या तीन गाड्या गेल्या तीन वर्षांपासून विनावापर अडगळीत पडल्या होत्या. महापालिका प्रशासनाने या गाड्या वापरासाठी आता ८४ लाख ९० हजार यांची निविदा काढली आहे. पण केवळ या गाड्या तीन रस्त्यांवरच फिरणार असल्याने शहरातील बहुतांश भागातील रस्ते धुळीनेच माखलेले राहणार आहेत.
पुणे शहराच्या विविध भागांत सुरू असलेले बांधकाम प्रकल्प, महापालिकेचे उड्डाण पूल, भुयारी मार्ग, रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. शहरात दिवसरात्र सिमेंट, खडी, माती यांची वाहतूक करणारी वाहने रस्त्याने धावत आहेत. त्यामुळे शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. नागरिकांना या धुळीचा त्रास होत आहे. केंद्र सरकारने पुणे महापालिकेला राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेतून (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम) धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी निधी दिली आहे. त्यातून रस्त्यावर पाणी फवारणी करण्यासाठी टँकर घेण्याचा निर्णय करण्यात आला. जुलै २०२१ मध्ये ८० लाख ९ हजार रुपये खर्च करून तीन टँकर खरेदी व एक वर्ष या गाड्या शहरात फिरविण्यासाठी २२ लाख २७ हजार रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला. या गाड्या महापालिकेने घेतल्या, पण रस्त्यावर पाणी मारताना कधीही टँकर दिसले नाहीत. हे पाणी फवारणी करणारे टँकर फुरसुंगी, उरुळी देवाची येथील कचरा डेपो, कात्रज-मंतरवाडी रस्त्यावर वापरण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे.
धुळीचे प्रमाण होणार कमी
प्रशासकीय सूत्रानुसार तीन वर्षानंतर हे टँकर घेतले असले, तरी त्याचा वापर झालेला नाही. घनकचरा विभागाने आता पुढच्या दोन वर्षांसाठी ८४ लाख रुपयांची निविदा स्थायी समितीमध्ये मंजूर केलेली आहे. यामध्ये तीन टँकर तीन रस्त्यांवर फिरणार आहेत. त्यामध्ये रस्त्यावर पाण्याचा मारा केला जाणार असल्याने धूळ उडण्याचे प्रमाण कमी होईल. अपघात, वाहनचालकांना त्रास होण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.
एका रस्त्यावर ४० किलोमीटरचा प्रवास
तीन टँकरसाठी तीन रस्ते निश्चित केले जाणार आहेत. त्यामध्ये १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंचे पादचारी मार्ग आणि दोन्ही बाजूंचे दुभाजक असे एकूण ४० किलोमीटर दिवसभरात फिरणे आवश्यक आहे.
अशी होणार फवारणी
हा टँकर सात हजार लिटर क्षमतेचा आहे. टँकरच्या समोरच्या बाजूस चार ठिकाणांवरून फवारणी होईल. त्याचप्रमाणे गाडीच्या डाव्या आणि उजव्या बाजूने प्रत्येकी दोन आणि गाडीच्या वरच्या बाजूने दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार अशा १६ ठिकाणांवरून पाणी फवारणी होईल. त्यामुळे जवळपास रस्त्याचा बहुतांश भागात पाण्याचा मारा होणार आहे.
महापालिकेने २०२१ मध्ये रस्त्यावरील धुळीवर पाणी मारण्यासाठी तीन टँकर घेतले आहेत. पण हे टँकर वापरण्यासाठी ठेकेदार नियुक्त केलेला नव्हता. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली, पावसाळा वगळून दोन वर्षे हे तीन टँकर पाण्याचा मारा करून धुळीवर नियंत्रण आणणार आहेत.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.