पुण्यात येत्या १८ ते २२ डिसेंबर दरम्यान ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव होत आहे. यात प्रथम पदार्पण करणाऱ्या कलावंतांच्या भावना.....
गुरुबंधूसोबत सहगायनाने आदरांजली वाहण्यास उत्सुक
- कृष्णा बोंगाणे (रामपूर सहसवान घराणे)
माझ्या पणजोबांपासून आमच्याकडे वारकरी परंपरा आहे. त्यातील भक्तिसंगीत ऐकतच मोठा झालो. बालपणीच काका प्रा. कचेश्वर बोंगाणे यांनी मला शास्त्रीय गायन शिकवायला सुरुवात केली. त्यांचे गुरू पं. नाथ नेरळकर यांचेही मार्गदर्शन लाभले. काकांनीच मला प्रख्यात गायक उस्ताद रशीद खान यांच्याकडे नेले. त्यांच्याकडून १८ वर्षे तालीम मिळाली. सवाईच्या स्वरमंचावर गुरूंच्या मागे तानपुरा घेऊन एकदा बसलो होतो, तो दिवस आठवतो. गुरुबंधू नागेश आडगावकर आणि मी यंदाच्या महोत्सवात दुसऱ्या दिवशी सहगायनातून भीमसेनजींसारखे थोर गायक व आमच्या गुरूंना आदरांजली वाहणार आहोत. ही सेवा देण्यासाठी उत्सुकतेबरोबरच आत्मपरीक्षणाचीही भावना मनात दाटली आहे. उस्तादजींनी आम्हा प्रत्येकाच्या गळ्याचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन खास तयारी करवून घेतली. एखाद्या रागाची बंदिश दोघांनाही एकाच वेळी शिकवताना त्यांनी साचा होऊ दिला नाही. नागेशच्या आवाजाला धार आहे, तर माझा आवाज काहीसा जाड. उस्तादजी सांगत, ‘मैं जो गा रहा हूं, उसको अपनी खासियत में ढाल कर गाओ. उस तरह से सोचो और पेशकश करो.’ एरवी आम्ही शिष्य स्वतंत्रपणे कार्यक्रम करत असतो. सवाईतील सहगायनाच्या निमित्ताने ते जुने क्षण पुन्हा जिवंत होतील. मी आणि नागेश एकच राग, एकच बंदिश आपापल्या तऱ्हेने, परंतु परस्परपूरक गात खुलवायचा प्रयत्न करू.
विख्यात संगीतयज्ञात सेवेची अनमोल संधी
- सौरभ काडगावकर (जयपूर अत्रौली घराणे)
लहानपणी कधी तरी भीमसेनजींच गाणं ऐकलं आणि भारला गेलो. वडील पं. सुनील काडगावकर यांच्यासमवेत सवाई गंधर्व महोत्सवाला जाऊ लागलो. त्यांची गाणी टेपरेकॉर्डरवर ऐकू लागलो. वाढदिवसाला त्यांच्याच कॅसेट वडिलांकडे मागू लागलो. त्यांच्याच प्रेरणेने शास्त्रीय गायन करावेसे वाटू लागले. आधी वडिलांनी शिकवले. नंतर पं. रघुनंदन पणशीकर यांच्याकडे नेले. रघुदादांच्या गुरू विदुषी किशोरी आमोणकर आणि भीमसेनजी या दोघांमध्येही स्नेहभाव होता. योगायोग म्हणजे दोघेही राघवेंद्र स्वामींचे भक्त. दोघांचेही गाणे दैवी चमत्कार वाटावे असेच. अशा परात्पर गुरूंनी, त्यांच्या गुरूंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी आरंभलेल्या या संगीतयज्ञात यंदा मला सेवा देण्याची संधी मिळते आहे. या मंचावर रघुदादा काही वेळा गायले आहेत. आठ वर्षांपूर्वी येथेच त्यांच्यामागे तानपुरा घेऊन बसलो होतो. तेव्हा समोरचा विस्तीर्ण जनसागर पाहिला. त्यांच्यासमोर गाणे ही मोठी जबाबदारी असते, हे रघुदादांमुळे नकळत शिकलो. तेही भीमसेनजींना आदर्श मानतात. अशा पावन मंचावर ठराविकच वेळेत सादरीकरण आणि तेही रंजकतेने करणे, हे मोठे आव्हान असते. गुरुकृपेने ते माझ्या वाट्याला आले आहे. मोठ्या श्रद्धेने ते पेलण्यासाठी मी उत्सुक तर आहेच, त्याचबरोबर काहीसा हळवाही झालो आहे. देशभर अनेक ठिकाणी संगीत मैफलींमधून गात असलो तरी, या संधीबद्दल मनात अपार कृतज्ञता आहे.
(शब्दांकन : नीला शर्मा)
१) लोगो
२) कृष्णा बोंगाणे
३) सौरभ काडगावकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.