पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरने आजवर अनेक दर्जेदार प्रायोगिक नाटकांची मेजवानी चोखंदळ प्रेक्षकांना दिली आहे. याच मालिकेतील एक अभिनव प्रयोग असणारे ‘ये जो पब्लिक है’ हे नाटक आहे. ‘संवादी’ (इंटरॅक्टिव्ह) पद्धतीचे अर्थात प्रेक्षकांशी संवाद साधत आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मतानुसार पुढे जाणारे हे नाटक केवळ मंचावरील पात्रांची नव्हे; तर प्रेक्षकांनाही स्वतःशीच वैचारिक जुगलबंदी करण्यास भाग पाडते.
- महिमा ठोंबरे
डॉ. विवेक बेळे लिखित-दिग्दर्शित हे नाटक. पडदा उघडतो तेव्हा डावीकडे एका शिडीवर बसलेला ‘फिलिप्स’, तर उजवीकडे दिसतो तो चंपक. समोर दोन व्यक्ती दिसत असल्या तरी नाटक पुढे जाते, तसे या एकाच पात्राच्या या दोन बाजू असल्याचे लक्षात येते. या दोन व्यक्ती डाव्या-उजव्या मेंदूचे, किंवा डाव्या-उजव्या विचारसरणींचे किंवा बुद्धी अन् भावनांचे (पंचेंद्रियांचे) प्रतिनिधी आहेत, असा निष्कर्ष निघू शकतो. मात्र लेखक याबाबत कोणतेही ठाम विधान करत नाही.
नाटक पुढे जाते, तसे चंपकच्या आयुष्याचा प्रवास प्रेक्षकांपुढे उलगडतो. पण प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांचे मत विचारात घेतले जाते. प्रेक्षकांच्या हातात टेबल टेनिसच्या रॅकेट दिलेल्या असतात; ज्यात एका बाजूला हिरवा रंग आणि दुसऱ्या बाजूला लाल रंग असतो. प्रत्येक टप्प्यावर या रॅकेटची एक बाजू दाखवून प्रेक्षकांना त्यांचे मत नोंदवण्यास सांगितले जाते. ज्या रंगाची संख्या अधिक, त्याच मतानुसार नाटक पुढे जाते. ही कल्पना रंजक असली, तरी प्रत्यक्षात आणणे नक्कीच अवघड असणार. मात्र लेखकाने अजमावलेल्या सर्व शक्यतांमुळे हा प्रयोग रंगतदार होतो. नाटकातील पात्रांच्या आयुष्यातील घटनांवर, निर्णयांवर आपले मत नोंदवताना प्रेक्षकही विचारप्रवृत्त होतात. आपल्यासारखेच आयुष्य असणाऱ्या व्यक्तींबाबत मत नोंदवताना आपसूकच प्रेक्षक स्वतःच्या आयुष्याशी तुलना करून पाहतात.
नाटकाची जमेची बाजू म्हणजे हे असे विचारप्रवृत्त करणारे नाटक असले; तरी निखळ विनोदाच्या वाटेवरून जाणारे आहे. कसलाही उपदेश न करता देखील नाटकामागचा विचार साध्या-सोप्या पद्धतीने पोहोचविण्याचे श्रेय विवेक बेळे यांच्या लेखणीला आहे. अन् संहितेतील हा नवा प्रयोग तितक्याच ताकदीने सादर करण्याचे श्रेय बेळे यांच्या दिग्दर्शनाला आहे. नाटकातील एक पात्र संपूर्ण नाटकभर केवळ एका शिडीवर बसलेले असते; मात्र तरीही त्यात अडकायला होत नाही, हे नाटकाचे वैशिष्ट्य आहे. अपूर्व साठ्ये यांचे नेपथ्य व प्रकाशयोजना आणि गंधार संगोराम यांचे संगीत हे कल्पकतेमुळे नाटकाला योग्य उठाव देतात.
चौफेर फटकेबाजीच्या दोन भूमिका
नाटकातील दोन प्रमुख भूमिका आनंद इंगळे आणि सुनील अभ्यंकर या कलाकारांनी साकारल्या आहेत. अभिनेत्याला चौफेर फटकेबाजी करण्याचा वाव देणारी ही दोन्ही पात्रे आहेत. त्याचा पुरेपूर उपयोग करत या दोघांनीही आपापल्या भूमिकांचे सोने केले आहे. आनंद इंगळे एकीकडे व्यावसायिक रंगभूमीवर भिन्न पठडीच्या व्यक्तिरेखा साकारत असताना अशा प्रकारच्या प्रायोगिक नाटकातील त्यांचे कामही स्मरणात राहणारे आहे. गायत्री तांबे-देशपांडे यांचा आई आणि बायकोच्या भूमिकेतील वावर सहज आहे. भूमिकेची लांबी कमी असूनही दोन्ही कलाकारांना त्यांनी उत्तम साथ दिली आहे. एकूणच उत्तम भट्टी जमून आलेले हे अभिनव नाटक, चुकवू नये असेच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.