पुणे, ता. ५ : एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी महिलांची संख्या वाढती असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अक्षरा सेंटर या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यांनी ‘जागा दाखवा’ या संकल्पनेवर आधारित प्रबोधनात्मक तीन व्हिडिओ तयार केले असून एसटी महामंडळाने राज्यातील सर्व स्थानकांवरील डिजिटल स्क्रीनवर ते प्रसारित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे व्हिडिओ तब्बल ९० लाखांहून अधिक नागरिकांनी बघितले असून ८६ हजारांपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत.
राज्य सरकारने महिलांना तिकिटाच्या अर्ध्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये प्रवासी महिलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बसमध्ये महिलांची छेड काढणे, त्यांना त्रास देणे आदी प्रकार सुरू झाले आहेत. त्याला अटकाव करण्यासाठी अक्षरा सेंटरच्या सहसंस्थापक डॉ. नंदिता शहा यांनी पुढाकार घेतला. प्रत्येकी ३० सेकंदांचे प्रबोधनात्मक तीन व्हिडिओ त्यांनी एसटी महामंडळाला तयार करून दिले. त्यात बसमध्ये महिलांबरोबर आगळीक होत असेल तर, संबंधितांना त्यांची ‘जागा दाखवा’ असा संदेश दिला आहे.
प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अक्षरा सेंटर गेली १० वर्षे मुंबईत ‘बेस्ट’बरोबर कार्यरत आहे. त्यासाठी त्यांनी आचारसंहिता तयार केली असून बेस्टच्या २६ आगारांमधील १३ हजार ५०० चालक-वाहकांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
एसटी बसमध्ये प्रवासी महिलांची संख्या वाढती आहे. अनेकदा त्यांना पुरुष प्रवाशांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना सामोरे जावे लागते. भीतीमुळे त्या बोलत नाहीत. परंतु, त्यांच्यात जागरूकता निर्माण करून बस प्रवासात सुरक्षितता निर्माण करण्याचा उद्देशाने हे व्हिडिओ तयार केले आहेत. त्यामाध्यमातून जागरूकता होत असून काही प्रमाणात बदलासही प्रारंभ झाला आहे.
- डॉ. नंदिता शहा,
सहसंस्थापक, अक्षरा सेंटर
प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणारे व्हिडिओ एसटीच्या ५६० पैकी ३०० स्थानकांतील डिजिटल स्क्रीनवर दाखविले जात आहेत. उर्वरित स्थानकांवरही ते अल्पावधीत दाखविले जातील. याबाबत वाहक-चालकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.
- अभिजित भोसले,
जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ
दृष्टीक्षेपात...
५५ लाख
- एसटीची सरासरी प्रवासी संख्या
२२ लाख
- महिला प्रवासी संख्या
३८ हजार
- एसटी वाहक
३४ हजार
- एसटी चालक
एक लाख
- बसमार्ग
१४ हजार
- एसटी बस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.