सनील गाडेकर
पुणे, ता. ९ : ग्राहक कंपनीकडून आलेले काम वेळेत पूर्ण केले, तर कंपनीची प्रतिमा चांगली राहून त्यानुसारच बिल घेता येते. त्यामुळे कटाक्षाने पाळली जाणारी डेडलाईन. वेळेत काम केले तर कंपनीकडून प्रोत्साहन भत्ता (इन्सेंटिव्ह) दिला जातो. हा भत्ता मिळावा यासाठी व डेडलाईन पाळण्यासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम केल्याने कामाचे प्रेशर वाढत असल्याची स्थिती सध्या जगातील बड्या कंपन्यांत आहे.
हृदयविकाराच्या धक्क्याने नुकताच मृत्यू झालेल्या सीए ॲना सेबॅस्टियन यांच्या आर्इनेदेखील याकडे लक्ष वेधले आहे. कामाच्या अतिताणामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तिच्या मृत्यूस त्यांनी मुलगी कार्यरत असलेल्या कंपनीला जबाबदार धरले आहे.
असे आहे प्रोत्साहन भत्त्याचे गणित
जगातील विविध कंपन्यांकडून या बड्या चार कंपन्यांना विविध प्रोजेक्ट येत असतात. ते वेळेत पूर्ण करून देण्याची जबाबदारी या कंपन्या पार पाडतात. प्रोजेक्ट वेळेत किंवा त्या आधी तयार केला, तर ग्राहक कंपनी या कंपन्यांना अधिकचे पैसेदेखील देतात. त्यामुळे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी बड्या कंपन्या त्यांच्या कामगारांना प्रोत्साहन भत्ता देतात. कर्मचाऱ्यांनी किती वेळेत आणि किती दर्जात्मक पद्धतीने काम पूर्ण केले आहे. त्यावर त्या भत्त्याची रक्कम ठरते. त्यामुळे हा भत्ता मिळावा यासाठी कर्मचारी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करतात. त्यातून काही वेळा त्यांच्यावर कामाचा दबाव तयार होतो.
नवीन ग्राहकदेखील मिळवून दिले जातात
बड्या कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट पार्टनर अशी संकल्पना आता रुजू होत आहे. कर्मचाऱ्याने कंपनीला नवीन ग्राहक जोडून द्यायचे, त्या बदल्यात कंपनी प्रोजेक्टच्या रकमेतील काही भाग कर्मचाऱ्याला देते. त्यामुळे कर्मचारी नवीन ग्राहकांच्या शोधात असते. काही वेळा तर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना नवीन ग्राहक शोधण्याचे टार्गेटदेखील दिले जाते.
बड्या कंपन्यांत नवीन शिकण्यासारखे खूप काही असते. मात्र, त्या प्रकारचे प्रेशरदेखील तेथे सहन करावे लागते. खासकरून नव्याने नोकरीला लागलेल्यांना त्याचा सामना करावा लागतो. काहींना ते सहन न झाल्याने काही महिन्यांतच नोकरी सोडल्याचे प्रकारदेखील घडले आहेत. सुरुवातीच्या काळात असलेला ताण आणि काम करण्याची ऊर्मी या दोन्हींचा समतोल ज्याला चांगल्या प्रकारे जमतो ते कर्मचारी टिकून राहतात. मात्र, एकंदरीत प्रेशर असते. या बाबीचा वरिष्ठांनीदेखील विचार करायला हवा.
-एका बड्या कंपनीत कार्यरत असलेला कर्मचारी
ठराविक काळानंतर छोट्या कंपन्यांना प्राधान्य
बड्या कंपनीत काम केल्याचा पाच ते सहा वर्षांचा अनुभव आणि त्या कंपन्यांच्या कामाची पद्धत समजल्यानंतर तेथील अनेक कर्मचारी त्या कंपनीच्या तुलनेत छोटी असलेल्या कंपनीत काम करण्यास प्राधान्य देत असतात. त्यामागील प्रमुख दोन कारणे अशी की, आधीच्या कंपनीच्या तुलनेत पगार अधिक मिळतो व कामाचा तणाव कमी होतो. त्यामुळे अशा बड्या कंपन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.