पुणे, ता. २१ : वैशाख वणवा पुन्हा पेटल्याची जाणीव पुणेकरांनी मंगळवारी झाली. शहरात कमाल तापमानाच्या पाऱ्याने १६ दिवसांनंतर पुन्हा चाळीशीच्या पलिकडे उसळी मारली. राजगुरुनगर येथे कमाल तापमान ४३.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये शिवाजीनगर येथे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे.
शहरात पाच मे रोजी ४०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर शहर आणि परिसरात १० मेपासून वळीव पडू लागला. त्याचा थेट परिणाम उन्हाचा चटका कमी होण्यात झाला. शहरात रविवारी (ता. १२) ३१.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाचा पारा कमी झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून दुपारी उन्हाचा चटका आणि संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस असे हवामान होते.
मंगळवारी मात्र आकाश निरभ्र होते. त्यामुळे शिवाजीनगर येथे कमाल तापमानाचा पारा ४०.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा ४.३ अंश सेल्सिअसने तापमान वाढल्याची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान पुण्यात वाढल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले.
शहर आणि परिसरात सकाळपासून वाढणाऱ्या झळा दुपारच्या वेळी चांगल्याच तापदायक ठरत होत्या. सूर्याच्या तप्त किरणांनी वैशाख वणव्यात जमीन होरपळून निघत असतानाच असह्य उकाड्याने घामाच्या धारा वाहत आहेत. तर काही ठिकाणी दुपारनंतर काळ्याकुट्ट ढगांची दाटी होत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पूर्वमोसमीच्या सरी हवेत गारवा आणत आहे.
हवामानाची सद्यःस्थिती
हरियाना आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मध्य प्रदेश ते मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर केरळ आणि परिसरावर तसेच उत्तर आंध्र प्रदेशात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरापासून कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
---
उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.
उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला.
---
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, बुलडाणा, अकोला,
अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ.
...........
पुण्यातील कमाल तापमान (आकडे अंश सेल्सिअसमध्ये)
वडगाव शेरी ...... ४२.७
हडपसर ............. ४२.३
पाषाण ................ ४१.८
मगरपट्टा ........ ४१.४
आंबेगाव ....... ४१
शिवाजीनगर .... ४०.६
एनडीए ............ ४०.२
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.