पुणे, ता. २७ ः रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या धारांमध्ये चिंब भिजत बराचवेळ गाण्यांवर थिरकणारे हजारो तरूण ‘त्या’ एका क्षणाला थांबले. ‘‘गोविंदा आला रे आला’’, ‘अरे बोल बजरंग बली की जय’चा जयघोष करत पथकांनी कडक सलामी दिली. त्यानंतर आला तो, श्वास रोखून धरणारा क्षण. एकावर एक असे गोविंदा पथकांचे सहा ते सात थर चढू लागले. मजबूत पकड, तितकीच चपळता, जिंकण्याच्या जिद्दीने पेटलेल्या बाल गोविंदाचे डोके थेट दहीहंडीला भिडले अन् लाखो पुणेकरांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडणारा ‘तो’ चित्तवेधक क्षण सर्वांनी ‘याची देहि याची डोळा’ अनुभवत सुटकेचा निःश्वास टाकला ! शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगराच्या बहुतांश भागांत मंगळवारी रात्री दहीहंडी उत्सवाच्या अशा आनंदोत्सवात अवघे पुणेकर मनसोक्तपणे न्हाऊन निघाले !
प्रथेप्रमाणे कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या माळेत पहिले फूल गुंफणाऱ्या दहीहंडीचे वेध लाखो भाविकांना लागतात. हाच दहीहंडीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मंगळवारी पुणे जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमधील लाखो भाविकांची पावले पुण्याकडे वळली. दुपारी चार वाजल्यापासूनच शहराच्या मध्यवर्ती भागांत दहीहंडीच्या जल्लोषाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागांतील पेठा, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता या प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमधील दहीहंडी उत्सवाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
चौकाचौकातील मंडळांसमोर काही ढोल-ताशा पथकांनी वादन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर साउड सिस्टीमवर उडत्या तालावरची गाणी वाजण्यास सुरुवात झाली. हिंदी, मराठी गीतांसोबत आकर्षक विद्युत रोषणाई व लेझर लाइटची मिळालेली साथ आणि त्याचवेळी पावसाने हजेरी लावल्याने हा आनंदोत्सवाचा सोहळा आणखीनच रंगतदार बनला. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, नोकरदार तरुण-तरुणींसह अनेक कुटुंबांनीही गाण्यांवर मनसोक्तपणे थिरकत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला. सुवर्णयुग तरुण मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ या मंडळांसह मध्यवर्ती भागातील बहुतांश मंडळांच्या दहीहंडीसमोर भाविकांची पावले थिरकली.
दहीहंडी उत्सव मंडळांनीही वैविध्यपणा जपला. आकर्षक फुलांची रचना, कृष्णलीलांवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण देखावेही सादर करण्यात आले. विश्वविजेत्या क्रिकेट संघाचे फ्लेक्स, दहीहंडीला वर्ल्डकपचे दिलेले स्वरूप, काही मंडळांनी वाद्य, तर काही मंडळांनी ऑलिंपिकमधील विजेत्यांचे फ्लेक्स लावून उत्सव साजरा केला. काही मंडळांच्या उत्सवाला मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांमधील कलाकारांनी आवर्जुन हजेरी लावली. दहीहंडी फोडल्यानंतरही रात्री साडे दहा वाजेपर्यंत साउंड सिस्टीमवर गाणी सुरू होती.
राधेकृष्ण ग्रुप, शिवतेज संघाने फोडली हंडी
सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाने ७ थर लावून फोडली. पथकाच्या विराज कांबळे या बाल गोविंदाने दहीहंडी फोडून सगळ्यांचे लक्ष वेधले. दहीहंडी संघाला ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात आले. त्यापाठोपाठ हुतात्मा बाबू गेनू मंडळाची दहीहंडी कसब्यातीलच शिवतेज दहीहंडी संघाने रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी फोडली. या गोविंदा पथकालाही ५१ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. दरम्यान, दहीहंडी फोडण्यासाठी पुणे जिल्ह्यासह अन्य भागातूनही काही गोविंदा पथके आली होती.
महिला सुरक्षिततेचा सामाजिक संदेश
पांगुळआळी येथील श्रीकृष्ण तरुण मंडळाने कृष्ण भगवान यांचा ‘कालिया मर्दन’ हा देखावा सादर केला. शनिवार वीर मारुती दहीहंडी उत्सव मंडळानेही वैशिष्ट्यपूर्णपणे देखावा सादर केला. शुक्रवार पेठेतील व्हाइट हाउस मित्र मंडळाने दहीहंडी उत्सव साजरा करतानाच सामाजिक बांधीलकी जोपासली. मंडळाने महिलांवरील अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणारे संदेश उत्सवावेळी लावून जनजागृती केली.
लेझर, साउंड सिस्टीमचा प्रचंड वापर
पोलिसांनी लेझर वापरण्यास बंदी घातली होती. त्यानंतरही दहीहंडी उत्सवात लेझर लाइटचा मोठा वापर करण्यात आला. तसेच ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचेही सर्रासपणे उल्लंघन झाले. त्याचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. याबरोबरच वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची गैरसोय झाली.
‘राजकीय’ पाठबळ
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दहीहंडी उत्सवही तितकाच जोरात झाला. बहुतांश मंडळांना इच्छुक राजकीय व्यक्तींनी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे मंडळांनी अद्ययावत साउंड सिस्टीम, लाखो रुपयांची बक्षिसे, मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केल्याचे चित्र उत्सवात दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.