बावडा, ता. ३० ः सध्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे फोन येत आहेत. परंतु कोणाला होकार दिलेला नाही. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यात परिवर्तन अटळ असून, विधानसभा निवडणुकीसंदर्भातील पुढचा निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी बावडा (ता. इंदापूर) येथे कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात पाटील काय निर्णय घेतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
बावड्यातील रत्नाई निवासस्थानी आयोजित सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. इंदापूर तालुक्याची विस्कटलेली घडी बसवावी लागणार आहे, असे नमूद करून पाटील यांनी इंदापूर विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले.
पाटील म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेच्या जागेसंदर्भात जे वक्तव्य केले ते महायुतीच्या धर्माचे पालन करणारे नव्हते. त्यांना महायुतीत हा अधिकार कोणी दिला. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्यांना जायचे त्यांना थांबवू शकत नाही, असे केलेले वक्तव्य कोणता संदर्भ घेऊन केले, हे समजत नाही. कारण मी अजून कोणतेही वक्तव्य केलेले नाही.’’
इंदापूर तालुका १० वर्षांत सर्वांगीण विकासात मागे गेला आहे. जनतेच्या भावना काय आहेत, याचा विचार करू, चर्चा करू, एकत्र बसू, सगळ्यांशी विचारविनिमय करू तसेच भाजपच्या वरिष्ठांशीही चर्चा करू. मात्र कोणताही निर्णय अंधारात घेणार नाही, स्वाभिमानाने घेतला जाईल.
असेही पाटील यांनी सांगितले.
या वेळी अॅड. शरद जामदार, उदयसिंह पाटील, बाबा महाराज खरतोडे, डॉ. लक्ष्मण आसबे, समीर मुलाणी, ब्रह्मदेव कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.