देखावे पाहण्यासाठी उच्चांकी गर्दी
गणरायाच्या दर्शनासाठी मध्य पुण्यात भक्तांचा महापूर
पुणे, ता. १५ ः गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी मध्य पुण्यात आलेल्या भक्तांच्या गर्दीने रविवारी उच्चांक गाठला. रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधत दर्शनासाठी आलेल्या नागरिकांमुळे या भागात भक्तांचा महापूर लोटला होता. यामुळे रात्री उशिरापर्यंत सगळेच रस्ते भाविकांनी तुडुंब भरले होते.
गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (ता. १७) होणार आहे. देखावे पाहण्यासाठी अवघे दोन दिवस उरल्याने आणि त्यातच रविवार मिळाल्याने अनेकांनी मध्य पुण्यात धाव घेतली. यात पुणेकरांसह उपनगरे आणि जिल्ह्यातील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
पावसाने विश्रांती घेतल्याने साऱ्यांच्याच उत्साहाला उधाण आले होते. सकाळपासूनच या गर्दीला सुरुवात झाली. सायंकाळी गर्दीने उच्चांक गाठला. अनेकांनी तर रात्री उशिरापर्यंत जागून गणरायाचे दर्शन घेतले. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांनी मेट्रो, बस यासारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर केला. दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर आलेल्या नागरिकांनी नदीपात्रासह जयंतराव टिळक पूल येथे आपल्या वाहनांचे पार्किंग केले होते. तेथून पायी चालत भक्तांनी छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, सदाशिव पेठ आदी परिसरातील देखावे पाहिले.
मानाच्या गणपतींसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींसमोर थांबून हा जनसागर आपल्या डोळ्यांत गणरायाचे लोभस रूप साठवून घेत होता. हेच रूप आणि नानाविध मनोहारी देखावे आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठीही अनेकांची धडपड सुरू होती. गणपती पाहून झाल्यानंतर पोटातील भूक शमविण्यासाठी साऱ्यांची पावले उपहारगृहांकडे वळली.
----
गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशक्य
गणपती पाहण्यासाठी आलेल्या भक्तांची संख्या सायंकाळनंतर प्रचंड प्रमाणात वाढत गेल्याने काही काळ गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. पोलिस, स्वयंसेवक आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले होते. त्यातच चौकाचौकात काही ढोल-ताशा पथकांचे स्थिर वादन सुरू असल्याने गर्दीत भरच पडत होती. यामुळे मध्य भागातील कोणत्याही रस्त्यावरून अगदी पायी चालणेही कठीण झाले होते.
---
सर्वांचीच दमछाक
गर्दीमुळे होणारी घुसमट आणि त्यात वातावरणातील उकाड्याची भर यामुळे काही ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच महिलांना त्रासही झाला. अनेक तरुणही त्यामुळे थकले होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.