पुणे

उदयोन्मुख भारतात मिळणाऱ्या संधींसाठी युवकांनी व्हावे सज्ज

CD

पुणे, ता. ११ : ‘उदयोन्मुख भारतात युवकांना पुढील काळात चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारत विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून हे केवळ युवकांच्या भरवशावर साध्य होणार आहे. त्यामुळे पुढील काळात अनेक संधी निर्माण होणार असून त्या संधींचा फायदा आपण कशा पद्धतीने घेत आहोत, त्या संधी कशा मिळवितो, हे आजच्या तरूणांच्या हातात आहे. या संधी मिळविण्यासाठी तरूणांनी सतत नवीन शिकत राहण्याची वृत्ती आत्मसात करावी,’ असा सल्ला पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी दिला.
‘सकाळ’च्या ‘यिन समर युथ समिट’मध्ये डॉ. देशपांडे यांच्याशी ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक सम्राट फडणीस यांनी संवाद साधला. याचा प्रश्नोत्तररुपी सारांश असा ः

करिअर ठरवून घडविता येते का?
- आजचे सर्वाधिक युवक १८ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. वैद्यकीय क्षेत्राची प्रगती पाहिल्यास ही मुले १०० वर्षांपेक्षा जास्त काळ जगणार आहेत. त्यामुळे आजचे अनेक युवक २१०० हे वर्ष पाहणार आहेत. यातील अनेक मुले २०८०-८५ पर्यंत काम करणार आहेत. करिअरबाबत पुढील ६० वर्ष काय करणार, असा विचार ते करतील. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. पुढील काळात ही अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकावर नेणे युवकांच्या हातात आहे. येत्या काळात नोकरी-व्यवसायाच्या शोधात असणाऱ्या युवकांना देशातच मोठ्या संधी उपलब्ध होतील. करिअरच्या वाटचालीत पहिली नोकरी काय असेल याचा विचार न करता आपण काय शिकलो तर पुढील ६० वर्षांत त्याचा उपयोग होईल, हे पाहायला हवे.
करिअर घडविताना टप्पे कसे करावेत?
- तुम्ही ४०-५० वर्षे करिअर करणार असाल तर हे टप्पे दहा वर्षांत विभागावेत. पहिल्या दहा वर्षांत ‘लर्निंग टू लर्न’ आणि ‘लर्निंग टू नेटवर्क’ याकडे लक्ष केंद्रित करावे. पुढील दहा वर्षांत तुम्ही कोणत्या तरी एका विषयात तज्ज्ञ, अभ्यासक व्हावे. त्यानंतरच्या दहा वर्षांत तुम्हाला अंतिमतः मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), मुख्य विपणन अधिकारी (सीएमओ), मुख्य अनुभव अधिकारी (सीएक्सओ) होण्यासाठी तयारी करावी. त्यानंतर सेवानिवृत्ती आणि त्यापुढील गोष्टींचा विचार करावा.
कोणती कौशल्ये आत्मसात करायला हवीत?
- प्रत्येक विद्यार्थ्याने तंत्रज्ञानातील प्रोग्रॅमिंग थोडेफार शिकायला हवे. कोणत्या तंत्रज्ञानात कोणते प्रोग्रॅमिंग वापरले आहे, वापरायला हवे हे शिकणे गरजेचे आहे. जीवशास्त्र, सिंथेटिक बायॉलॉजी अशा विषयांतील नवीन गोष्टी शिकाव्यात. त्याशिवाय प्रत्येकाने पैशाच्या व्यवस्थापन आणि नियोजनाबरोबरच विक्री आणि विपणन कौशल्य शिकावे.

छोट्या उद्योजकांना कसे मार्गदर्शन कराल?
- छोट्या उद्योजकांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. परंतु त्याची माहिती या उद्योजकांना नसते किंवा ती त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. कर्ज न मिळणे, बाजारपेठ उपलब्ध न होणे, तंत्रज्ञानाचा अभाव, मान्यता न मिळणे आणि कुशल कामगार उपलब्ध न होणे हे छोट्या उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न आहेत. हे प्रश्न कसे सोडवावेत, त्यासाठी आवश्यक माहिती कशी मिळवावी, याकरिता आम्ही ‘दे आसरा फाउंडेशन’च्या माध्यमातून मार्गदर्शन करतो.
‘गिग इकॉनॉमी’ हा काय प्रकार आहे?
- याआधीच्या पिढीत एकदा नोकरी घेतलेली नोकरी निवृत्तीपर्यंत करायची असे असायचे. आता परिस्थिती बदलत असून एका ठिकाणी शेवटपर्यंत नोकरी मिळणे कठीण होत आहे. आता एक प्रकल्प सगळे एकत्र येऊन काम करून पूर्ण करतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘चित्रपट क्षेत्र’. एखादा चित्रपट तयार करण्यासाठी वेगवेगळे लोक एकत्र येऊन एक ‘टिम’ होते आणि चित्रपटाची निर्मिती होते. परंतु त्या टीममधील अनेकजण एकाच वेळी दोन-तीन कामे करू शकतात. अशी परिस्थिती विविध क्षेत्रात असून त्यातून ‘गिग इकॉनॉमी’ विकसित होत आहे. ही कामे केवळ खालच्या स्तरावरील नसून, सीएमओ, सीए, सीएफओ अशा उच्च पदांवरील लोकही एकावेळी चार-पाच कंपन्यांमध्ये काम करीत असतात.
.........

भविष्याचा विचार करता ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’कडे कसे पाहता?
- कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे उत्पादकता प्रचंड प्रमाणात विकसित होणार आहे. ‘एआय’चा वापर कसा करायचा, त्याचे प्रोग्रॅमिंग काय, त्यातून उत्पादकता कशी वाढवायची, हे लोकांनी शिकले पाहिजे. तरूणांनी आतापासूनच ‘एआय’च्या युगाला सामोरे जाण्यासाठी तयारी करायला हवी. त्यात वापरण्यात येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नवा विचार केला पाहिजे.
---

डॉ. आनंद देशपांडे यांनी दिलेले कानमंत्र
- शिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यावर भर द्यावा
- अपयशातून खचून न जाता खेळाडूंप्रमाणे त्यातूनही शिकत पुढे जावे
- पुढील काळात एकावेळी वेगवेगळ्या नोकऱ्या करणे आवश्यक असेल
- फक्त नोकरीचा विचार न करता, स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा विचार करावा
- तुम्हाला सतत नवीन गोष्टी शिकत राहावे लागेल
- उत्पादन, जीवशास्त्र आणि विज्ञान, साहित्य आणि सेवा अशा क्षेत्रांत खूप संधी उपलब्ध होतील, त्यासाठी सज्ज व्हा
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT