१ .
दुकानच आमचं घर, ग्राहकच आमचं कुटुंब
दिवाळीच्या खरेदीत पुणेकर रंगलेले असताना... बाजारपेठा उजळलेल्या असताना...अन् घराघरांत फराळाचा सुगंध दरवळत असताना...तांबडी जोगेश्वरी परिसरातील एका छोट्या दुकानात मात्र वेगळीच दिवाळी साजरी होत असल्याचं ग्राहक-विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरील हास्यातून दिसत आहे.
लक्ष्मीकांत सायंकार, मूळचे विदर्भातील. ३० वर्षांपूर्वी त्यांनी कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि आता इथल्या गजबजलेल्या बाजारात त्यांनी आपलं आयुष्य गुंफलं. सुरुवातीला छोट्या खेळण्यांच्या विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता मुलांच्या कपड्यांच्या व्यवसायात फुललाय. सायंकार यांच्या दुकानातील रंगीबेरंगी कपड्यांमुळेच अनेकांच्या घरांतील लहान मुलांची दिवाळी उजळते. एवढंच नव्हे, तर स्वत: सायंकार यांच्या कुटुंबाची दिवाळीही यामुळे साजरी होत आहे. म्हणूनच त्यांचे दुकान ही केवळ त्यांच्या व्यवसायाची जागा नाही, तर तेच त्यांचे घर आहे. त्यामुळे, इतरांच्या घरी दिवाळी साजरी होत असताना, सायंकार कुटुंबाची दिवाळी मात्र त्यांच्या दुकानातच साजरी होते आणि त्यातूनच त्यांना खरा आनंद मिळतो.
मुलांनी कधीही ‘दिवाळी’ वेळेवर साजरी केली नाही. आपल्या मुलांचा हा त्याग आणि कामातील उत्साह हेच खरे वैभव असल्याचे सायंकार आवर्जून सांगतात. ते म्हणतात, ‘‘माझ्या मुलांनी कधी दिवाळी वेळेवर साजरी केली नाही, पण त्यांनी प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिलायं आणि तोच आमचा सर्वात मोठा सण आहे.’’
या कुटुंबासाठी दिवाळीचा खरा अर्थ फटाक्यांची आतषबाजी किंवा फराळ नाही, तर सेवेचा आनंद आणि ग्राहकांच्या आनंदी चेहऱ्यांतील प्रफुल्लित झालेले तेज आहे. त्यांच्या कामातील हे समर्पण आणि न थकणारा उत्साह हेच त्यांचे खरे दिवाळीचे वैभव आहे.
दिवाळी आमच्यासाठी केवळ सुट्टी किंवा सण नाही, तर कामाचा उत्सव आहे. ग्राहकांना सुंदर आणि नवे कपडे मिळावेत म्हणून आम्ही दिवाळीअगोदर तीन महिन्यांपासून तयारी सुरू करतो. दिवाळी जवळ आली की आमचं घर म्हणजे दुकानच होतं. आम्ही सगळे तिथेच असतो, ग्राहकांच्या समाधानातच आमचं समाधान असतं.
- लक्ष्मीकांत सायंकार
२. इतरांच्या सुखातच आमचं सुख उजळतं
पुण्याच्या गल्लीबोळात दिवाळीच्या सजावटीची लगबग सुरू आहे. बाजारात रंगीबेरंगी पणत्या, स्टिकर्स, रांगोळ्या विक्रीसाठी आल्या आहेत. या झगमगाटामागे मात्र काही साधी, शांत माणसं उभी आहेत, त्यापैकीच एक म्हणजे शिंदे कुटुंब. शिंदे कुटुंबाचं आयुष्य साधं आहे, पण आत्मसन्मान आणि मेहनतीची श्रीमंती त्यात भरलेली आहे. जेव्हा त्यांच्या हातांनी बनवलेल्या पणत्या आणि सजावटींनी इतरांचं घर उजळतं, तेव्हा त्यांच्या आयुष्याचंही आकाश थोडं उजळून निघतं.
‘‘आम्ही मोठी स्वप्नं बाळगणारी माणसं नाही. फक्त दोन वेळच्या जेवणासाठी आणि कुटुंबाच्या गरजांसाठी रात्रंदिवस कष्ट करणारी साधी माणसं आहोत’’ असे अशोक शिंदे सांगतात. ते म्हणाले, ‘‘आम्ही शिंदे कुटुंबीय वर्षभर, रोजंदारीवर मिळेल ते काम करतो. साफसफाई, मजुरी, किरकोळ कामे करून गरिबीचा गाडा रेटतो. सणावाराचा हा काळ मात्र आमच्या आयुष्याला थोडं बळ देतो. पणत्या, रांगोळी, दिवाळीचे स्टिकर्स, सजावटीच्या किरकोळ वस्तू विकून कसेबसे दिवस ढकलतो. या दिवसांत मिळणारे हे पाच ते दहा हजार रुपये आमच्या आयुष्यात मोलाची भर घालतात. त्यातूनच आम्ही कशीबशी दिवाळी साजरी करतो. पण इतक्या थोडक्या कमाईत वर्षभर पोट चालवणं अवघड होतं, म्हणून अनेकदा उसने पैसे घ्यावे लागतात’’
शालेय शिक्षण नाही, आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे हेच काम आमचं जीवन आहे. ग्राहकाने किंमत कमी करायला सांगितली तरी आम्ही मान्य करतो. कारण आमच्यासाठी नफ्यापेक्षा ग्राहकांच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान महत्त्वाचं आहे. दिव्यांच्या उजेडात जेव्हा इतरांचं घर उजळतं, तेव्हाच आमचं आयुष्यही प्रकाशमान होतं. त्यामुळे इतरांच्या सुखातच आम्ही आमचे सुख मानतो.
- अशोक शिंदे
३. आम्ही दिवाळी विकत नाही... ती उजळवतो!
अनेकांची दिवाळी सुगंधित करत... अन् त्यात पारंपारिक आयुर्वेदिक उटण्याची भर पाडत...दिवाळी पहाट ‘शाही’ थाटात करण्याचा प्रयत्न करणारे शिंदे कुटुंब. अगदी आजोबांच्या काळापासून व्यवसायातील ही परंपरा आजतागायत कायम जपली जात आहे. याच कुटुंबातील सदस्य सुरेश शिंदे म्हणतात, ‘‘गेल्या २५ वर्षांपासून मंडईमध्ये माझ्या आजोबांनी सुरू केलेल्या व्यवसायाचा वारसा जपतो आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे. आधुनिक उत्पादनांबरोबर आम्ही पारंपरिक वस्तू, आयुर्वेदिक उटणे, शाही स्नानाची सामग्री, सुगंधी अत्तर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.’’
सणासुदीचा काळ म्हणजे आमच्यासाठी धावपळीचा असल्याचे सांगत अधिक खुललेले शिंदे सांगतात, ‘‘श्रावण सुरू झाला की दिवाळीपर्यंत अखंड धावपळ सुरू होते. सकाळपासून रात्रीपर्यंत ग्राहकांची वर्दळ असते. घरातील सणाकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. मुलांच्या खरेदीला प्राधान्य द्यावंसं वाटतं, पण दुकान सांभाळण्यातच रात्र होऊन जाते. दिवाळीनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू झाला की पुन्हा धंदा जोमात येतो.’’
दिवाळीचा गोडवा आम्हाला जरा उशिरानेच मिळत. इतरांच्या सणाला उजाळा देताना स्वतःच्या सणाचा आनंद मागे पडतो. मात्र ग्राहक समाधानाने खरेदी करून हसत जातात, तोच क्षण आमच्यासाठी दिवाळीतील दिव्याप्रमाणे तेजस्वी असतो. त्यामुळे लोकांची दिवाळी साजरी झाल्यानंतर आम्ही आमची दिवाळी साजरी करतो.
- सुरेश शिंदे
४. हे सर्व श्रेय माझ्या आईचे...
अंबिल ओढा परिसरात आकाशकंदील विक्रीचा गेल्या २२ वर्षांपासून मारुती थोरात व्यवसाय करत आहेत. ‘या व्यवसायाचा पाया माझ्या आईने घातला आणि आजही ती आम्हाला मोलाची साथ देत आहे,’’ असे अभिमानाने थोरात यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘माझ्या आईने शिकवलेली मेहनत, प्रामाणिकपणा आणि सर्जनशीलता यामुळे आमचे संपूर्ण कुटुंब व्यवसायाशी घट्ट जोडले गेले आहेत. आमचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सांभाळून आम्ही घरगुती पद्धतीने आकर्षक आकाशकंदील तयार करतो.’’
‘‘शहराच्या कानाकोपऱ्यातून लोक आमच्याकडे आकाशकंदील घेण्यासाठी येतात. विशेष म्हणजे आम्ही परदेशात देखील आकाशकंदील पाठवतो आणि त्यासाठी आमची वेगळी ओळख आहे. हे सर्व श्रेय माझ्या आईचे आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या सहा महिन्यांपूर्वीच आमच्या घरात कामांची लगबग सुरू होते. प्रत्येकजण आपल्या कौशल्यानुसार हातभार लावतो. कुणी डिझाईन करते, कुणी रंगकाम तर कुणी विक्रीची जबाबदारी सांभाळतो. पण व्यवसायामुळे आम्हाला दिवाळी कुटुंबासोबत साजरी करता येत नाही. आम्ही ती दुकानामध्ये ग्राहकांसोबतच साजरी करतो.
- मारुती थोरात
५.....अन् आँचही उजळतं आयुष्य
‘दिवाळीत विजेच्या माळांच्या झगमगाटात आमचंही आयुष्यात उजळतं,’ असा अनुभव श्रवणसिंग राजपूत यांनी सांगितला. श्रवण हे पाच-सहा वर्षांपासून बुधवार पेठेत विजेच्या माळांचे दुकान चालवितात. मूळचे राजस्थानचे असणारे श्रवण आता पुण्यात घर घेऊन ‘पुणेकर’ झाले आहेत. ‘‘सुरूवातीला थोडी भीती होती. परक्या ठिकाणी व्यवसाय कसा चालेल?, ग्राहक कसे असतील?, पण पुणेकरांच्या प्रेमाने आणि विश्वासाने हे सगळे प्रश्न आपोआप मिटले,’’ असेही श्रवण यांनी आनंदाने सांगितले. ते म्हणाले, ‘‘सणासुदीच्या काळात, विशेषतः गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीत तर दुकानात उत्सवच भरतो. रंगीबेरंगी माळा, झगमगणारे दिवे आणि ग्राहकांच्या चेहऱ्यावरील आनंद, या सगळ्यामुळे आमचंही मन उजळून जाते. दिवाळीत व्यवसायात चांगला खप होतो आणि त्या प्रकाशात आमच्या कुटुंबाचं आयुष्यही उजळतं.’’
व्यवसायात चढ-उतार असतातच. पण दिवाळीचा काळ येतो तेव्हा त्या सगळ्या अडचणींवर प्रकाश पडतो. आमच्या दुकानातल्या माळा फक्त घरं सजवत नाहीत, तर आमच्यासारख्या मेहनती लोकांच्या आयुष्यातही उजेड पसरवितात. म्हणूनच माझ्यासाठी दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उत्सव नाही, तर आयुष्याला नव्याने उजळणारा प्रकाश आहे.
- श्रवणसिंग राजपूत
६. हातानं घडविणं, ही कार्यशाळाच!
‘‘दिवाळी जवळ आली की आमचं घर म्हणजे एक कार्यशाळाच बनते,’’ असे अगदी उत्साहाने सांगत कुंभारवाड्यातील मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या घरातील मातीपासून विविध वस्तू बनविण्याच्या परंपरेची ओळख करून दिली. त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही कुंभारवाड्यात राहतो आणि किल्ल्यांसाठी लागणारे मावळे तयार करणे हा आमचा कौटुंबिक व्यवसाय आहे. गेली ४०-५० वर्षे आमच्या घरात या परंपरेचा दिवा तेवत आहे आणि आता चौथी पिढीही ही परंपरा पुढे नेत आहे. मातीपासून मावळे बनवणे म्हणजे फक्त एक काम नाही, तर ते आमच्या इतिहासाशी, संस्कृतीशी नाळ जोडणारे आहे.’’
‘‘एक मावळा तयार होण्यासाठी खूप श्रम लागतात, पीओपी साच्यात ओतणे, वाळवणे, त्याला भजणे, रंगवणे हे सगळं टप्प्याटप्प्याने होतं. एका प्रकारच्या मावळ्याला रंगवायला एक दिवस तरी लागतो. आम्ही ५० प्रकारचे मावळे बनवतो. त्यासोबतच किल्ल्याभोवती लागणाऱ्या झाडा-झुडपांपासून तोफा, प्राणी, शस्त्रे अशा घटकांचीही निर्मिती आम्ही स्वतः घरी हातानेच करतो.’’
दिवाळी जवळ आली की आमचं घर म्हणजे एक कार्यशाळाच बनते. दिवाळीपूर्वी एक महिन्यापासूनच सगळ कुटुंब कामाला लागलेलं असतं. प्रत्येक मावळा म्हणजे आमच्या हातांचे श्रमदान आणि आमच्या परंपरेचा सन्मान आहे. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचा आनंद हेच खऱ्याअर्थाने दिवाळीचे समाधान असते.
- मीनाक्षी शिंदे
७.
दुकानच खरी ‘महालक्ष्मी’
‘‘दिवाळीत माझ्या दुकानालाच दिवा लावते, कारण हीच माझी खरी महालक्ष्मी आहे,’’ अशा सांगत महात्मा फुले मंडईतील ७५ वर्षांच्या रत्नमाला शिवले यांनी आपल्या अनुभवाचा खजिना उलगडला. ‘‘रांगोळीचा व्यवसाय हा फक्त माझा व्यवसाय नसून, ती माझ्या आयुष्यभराची पुंजी आहे. आई-वडिलांनी मला लहानपणापासूनच या व्यवसायाची ओळख करून दिली. ते स्वत: हा व्यवसाय करताना मलाही सोबत घेऊन यायचे. आमच्या दुकानात रांगोळीचे विविध प्रकार, साचे, पणत्या, लाह्या असे अनेक पारंपरिक पूजेचे साहित्य मिळते. पण माझ्यासाठी हे सगळं फक्त विक्रीचे साहित्य नाही, तर माझ्या जीवनाचा आधार आहे,’’ असे सांगत शिवले आजींनी समाधान व्यक्त केले.
‘‘मी गणेश पेठेमध्ये राहते आणि दरवर्षी दिवाळी आली की माझं दुकान म्हणजे एक उत्सवच असतो. लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिला की माझ्या थकलेल्या शरीरालाही ऊर्जा मिळते.’’
रांगोळीच्या व्यवसायावर माझा संसार, तीन मुली आणि एका मुलाचं शिक्षण केलं. त्यांचं भविष्य घडवलं आणि त्यांची लग्न केली. दिवाळीत घरापेक्षा आम्ही दुकानाला सजवतो. रोज दिवा लावतो, कारण हीच आमची लक्ष्मी आहे, संपत्ती आहे आणि हीच माझी ओळख आहे.
- रत्नमाला शिवले
८. व्यवसाय टिकवला आनंदासाठी!
घरगुती फराळाचा व्यवसाय सुरू करून आज तब्बल ३५-४० वर्षे झाली. आमचं एकत्र कुटुंब असल्यानं सुरुवातीपासूनच दरवर्षी किमान चार-पाच किलो फराळ घरी करण्याची सवय होती. चकली, करंज्या, लाडू, शेव या स्वादातूनच आमचं आयुष्य गोड झालं! हळूहळू माझ्या हातच्या फराळाला नातेवाईक आणि मित्रांकडून इतका चांगला प्रतिसाद मिळाला की, त्यांनी माझ्याकडे खास ऑर्डर देणं सुरू केलं. सुरुवातीला फक्त नातलगांसाठी बनवलेले फराळाचे डबे आज शेकडो घरांपर्यंत पोहोचतात, याचा मला खूप अभिमान वाटतो,’’ अशा शब्दांत वयाची ८३ गाठलेल्या शांताबाई जाधव यांनी सांगितले.
आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘सुरुवातीच्या काळात मी एकटीच सर्व करत होते. मिश्रण करणं, तळणं, पॅकिंग करणं. पण ऑर्डरचा आकडा वाढला, तसे माझ्या सुना आणि घरातील इतर मंडळींनीही या कामात साथ दिली. आमच्या घरातील सगळ्या पिढ्या आजी, सुना, नातवंडे सगळे मिळून फराळ बनवतात. या व्यवसायातून आम्ही केवळ उत्पन्नच नाही, तर एक कुटुंबीय परंपरा, एक सणाचा आनंद आणि महिलांसाठी स्वावलंबनाची वाट निर्माण केली आहे. सणासुदीला स्वतःच्या घरात गोडी पसरवताना दुसऱ्यांच्या घरातही तोच आनंद पोहोचवता येतो, हेच माझं खरं समाधान आहे.’’
पूर्वी प्रतिकिलो फराळ ७० ते ८० रुपयांना मिळायचा. आज त्याच दर्जेदार फराळाची किंमत ७०० ते ८०० रुपये प्रतिकिलो आहे. पण माझ्यासाठी त्याची खरी किंमत ही फक्त पैशांत नाही, तर लोकांच्या समाधानात आहे.
- शांताबाई जाधव
९. दिवाळीचा फराळ म्हणजे सणाचा आनंद आणि घरगुती चव. पण नऱ्हे येथील कादंबरी महिला बचत गटाने या परंपरेला व्यवसायाचे रूप दिले. या गटाच्या प्रमुख सारिका दीक्षित यांनी आपल्या प्रयत्नाने आणि नियोजनाने १५ महिलांना रोजगाराचा आणि स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखवला.
‘‘हातातले काम कधीच लहान नसते, फक्त त्यात मनापासून प्रयत्न हवेत,’’ असं ठामपणे सांगणाऱ्या सारिका या आज गटाच्या यशस्वी प्रमुख म्हणून ओळखल्या जातात. दिवाळीचा हंगाम आला की त्यांच्या गटाचा फराळ पुण्यातल्या ग्राहकांच्या पसंतीचा ठरतो. साध्या घरगुती स्वयंपाकातून सुरुवात झालेला हा प्रवास दिवाळीत एक ते दीड लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या गटातील १५ महिला एकत्र येऊन फराळ बनविण्यापासून पॅकिंग आणि विक्रीपर्यंतची सर्व कामे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करतात.
सारिका सांगतात, ‘‘गेल्या १२ वर्षांपूर्वी आम्ही छोट्या प्रमाणात चकली आणि करंजी बनवायला सुरुवात केली. हळूहळू मागणी वाढत गेली. आज आम्ही ५० किलो चकली, ३० किलो लाडू, तसेच करंजी, चिवडा, शंकरपाळी, अनारसे, करकरे असे पारंपरिक पदार्थ मागणीनुसार तयार करतो. ग्राहकांना आमची घरगुती चव आणि शुद्धतेवरचा विश्वास आवडतो.’’
पारंपरिक पदार्थांसोबतच कमी तेलकट आणि हेल्दी फराळालाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. फराळ विक्रीतून महिलांनी दाखवलेली एकजूट, श्रम आणि व्यावसायिक दृष्टिकोनामुळे कादंबरी महिला बचत गट हा स्थानिक पातळीवर महिला सक्षमीकरणाचे उदाहरण ठरला आहे.
या उपक्रमामुळे गटातील महिलांना फक्त आर्थिक स्थैर्य मिळाले नाही, तर आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी जाणीवही मिळाली आहे. वर्षभर विविध पदार्थांच्या ऑर्डर्स घेत, त्यांनी स्वतःचा व्यावसायिक मार्ग उभा केला आहे. महिला सदस्य कामाचे योग्य विभाजन करून सामूहिक पद्धतीने सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात.
- सारिका दीक्षित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.