पुणे, ता. २५ : मिळकतकराच्या बिलावर मिळणाऱ्या पाच ते १० टक्के सवलतीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी नेहमीप्रमाणे यंदाही आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत मिळकतकर भरण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये तब्बल ९३८ कोटी ३६ लाख रुपये इतका मिळकतकर जमा झाला आहे. सवलतीची मुदत संपण्यास आणखी पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
बांधकाम विभागापाठोपाठ मिळकतकरातून महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळते. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये मिळकतकर विभागाने ३२५० कोटी रुपये कर गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये मिळकतकर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करामध्ये पाच ते १० टक्के सवलत दिली जाते. नियमितपणे मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांकडून त्यास चांगला प्रतिसाद दिला जातो. आतापर्यंत पाच लाख ८० हजार ४७५ जणांनी ९३८ कोटी ३६ लाख रुपये इतका कर भरला आहे. दरम्यान, विविध प्रकारच्या मिळकतींमधून तब्बल १७ हजार कोटी रुपयांचा कर थकीत आहे. त्यामध्ये सर्वाधिक चार हजार कोटी रुपये इतकी थकबाकी मोबाईल टॉवर कंपन्यांकडून येणे आहे. त्यानंतर मोबाईल टॉवर कंपन्यांइतकीच दुबार मिळकतकराची थकबाकी देखील चार हजार कोटी रुपये इतकी आहे. न्यायालयात दावे दाखल असणाऱ्यांची थकबाकी दीड हजार कोटी तर, समाविष्ट गावांची थकबाकी १९०० कोटी रुपये इतकी आहे.
जूननंतर थकबाकी वसुलीला वेग
मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या मिळकतकर व करआकारणी विभागाकडून दरवर्षी प्रयत्न केला जातो. यंदाही जून महिन्यानंतर थकबाकी वसुलीवर मिळकतकर विभाग भर देण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी ३० जूनपर्यंत मिळकतकर भरल्यास त्यांना मिळकतकराच्या बिलामध्ये सवलतीचा लाभ मिळेल. त्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालये व ऑनलाइन पद्धतीनेही कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- अविनाश सपकाळ, उपायुक्त, मिळकतकर आकारणी विभाग, महापालिका
मिळकतकर भरण्याचे प्रकार मिळकतदारांची संख्या जमा रक्कम (कोटींमध्ये)
ऑनलाइन - ४ लाख ३ हजार २१० ५८६.०८
रोख रक्कम - १ लाख १४ हजार ०२ ९९.६५
धनादेश, डीडी - ६३ हजार २६३ २५२.६३
एकूण - ५ लाख ८० हजार ४७५ ९३८.३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.