हिंदुस्थानात छत्रपती शिवरायांनी लोककल्याणकारी राज्याची पायाभरणी केली. त्यानंतर दोनशे वर्षांची महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी समता, बंधुत्व व जनकल्याणातच मोक्ष शोधून त्यावर कळस चढविला. त्यांची ही ओळख आज नव्याने करून घेण्याची गरज आहे. ११ मार्च हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त...
- बाबा भांड
शेतकऱ्याचा मुलगा ते असामान्य प्रवास केलेले महाराजा सयाजीराव गायकवाड हे सरस्वती आणि लक्ष्मीची कृपा असलेले, शिक्षणातून ज्ञानात्म प्रबोधनाचे परिवर्तन ओळखणारे प्रज्ञावंत राजा होते. त्यांनी शून्यातून विश्व उभारून जनकल्याणातच मोक्ष शोधला. शिक्षणातून सुप्रशासनाची ताकद ओळखून ती गंगा जनसामान्यांच्या दारी नेली. सामाजिक सुधारणा हाच प्रगतीचा पहिला टप्पा आहे, हे ओळखून आयुष्यभर ज्ञान प्रबोधनातून त्यांनी हे जनकल्याणाचे काम केले. सामाजिक जीवनात धर्म केंद्रस्थानी असतो; पण अज्ञानामुळे रूढी-परंपरांतील अनिष्ट गोष्टी वाढल्या हे त्यांनी ओळखले. त्यासाठी धर्मखाते सुरू करून सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केला. पुरोहित कायदा करून त्यांची परीक्षा घेऊन परवाना देणे सुरू केले. बालविवाह प्रतिबंध, मुला-मुलींच्या लग्नाचे वय ठरविणे, दत्तक घेणे, घटस्फोटास परवानगी, विधवा पुनर्विवाह, कौटुंबिक मालमत्तेत पत्नी-मुलीचा अधिकार, संन्यास घेणाऱ्यास पत्नी-मुलांची सहमती, ज्ञाती त्रास निवारण, बालसंन्यासास बंदी, दानधर्मात सुधारणा, राजवाड्यातील पंगतीभेद दूर करणे आणि सार्वजनिक ठिकाणं, कार्यालये, मंदिरांत अस्पृश्यांना प्रवेश-यासाठी कायदे करून सामाजिक सुधारणांची अंमलबजावणी केली. सोळा वर्षांखालील मुलांना विडी, सिगारेट, तंबाखू विकण्यास बंदी केली. शेतकी उपयोगी जनावरांची कायद्याने हिंसा बंद केली.
सामाजिक सुधारणांबरोबरच ज्ञानात्म प्रबोधनातूनच देश-राष्ट्रप्रगती होते, हे ओळखून साहित्य, कला संस्कृती ही राष्ट्राची संपत्ती असल्याने या सर्वांचे महाराज पोशिंदे झाले, ते गादीवर आले तेव्हा राज्य काही रुपयांत तोट्यात होते. अनावश्यक दानधर्म व इतर खर्चांना कात्री लावत महाराजांनी राज्यात उत्पादन वाढविले, पंचवीस वर्षांत ते जगातले सातवे श्रीमंत झाले. श्रीमंतीचा उपयोग विद्यार्थी, गरजू कलावंतांना उभ्या आयुष्यात ८९ कोटींची मदत केली. यात टाटा, दादाभाई, गांधी, टिळक, फुले, आंबेडकर, गोखले, रानडे, सावरकर, पं. मालवीय, डॉ. मुंजे यांसारखे हजारो आहेत. जगातल्या पहिल्या विमानोड्डाणास मदत, जागतिक धर्मपरिषद शिकागोचे अध्यक्ष, बनारस विद्यापीठाचे चान्सलर, बडोद्यातून ७५०० ग्रंथ प्रकाशित करणारे, गावोगाव ग्रंथालये उभारणारे दूरदर्शी होते. पुण्यातील ३० हून अधिक महत्त्वाच्या संस्थांना महाराजांनी फार मोठी मदत केली.
ग्रामपंचायतीचा सदस्य साक्षर असावा असा कायदा केला. आशिया खंडातील पहिला शेतकरी साखर कारखाना सुरू केला, ते ग्रंथमित्र होते. वाचन-लेखन करणारे प्रज्ञावंत राजा होते. दुष्काळ, अतिवृष्टी अन् संकटावर त्यांनी मदत देऊन मात केली. सयाजीराव स्वातंत्र्यवीरांचे पाठीराखे होते. ब्रिटिश सीआयडीनी राजद्रोही ठरविण्यासाठी त्यांचा २५ वर्षे पाठलाग केला; पण सयाजीरावांनी ठोस पुरावा हाती लागू दिला नाही. त्या आरोपाच्या फायली A Banded Box Case शिक्का मारून ६० वर्षे बंद केल्या. यातील १५ फाडली लंडनच्या अभिलेखागारातून मिळवून आपण नुकत्याच प्रकाशित केल्या आहेत.
स्वच्छ चारित्र्य, निर्व्यसनी, सार्वभौम राजा महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आयुष्यभर जनकल्याणात आपला मोक्ष शोधला. ११ मार्च हा सयाजीरावांचा जन्मदिवस, या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.