पुणे, ता. १० ः महागडी मोटार येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध थांबवून लघुशंका आणि अश्लील चाळे केलेल्या गौरव आहुजाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने मोटारीची ‘नंबरप्लेट’ काढून तिची विल्हेवाट लावली. त्याच्या मोटारीत मद्याची बाटली आणि ग्लास आढळले. पोलिसांनी मोटार व त्यातील वस्तू जप्त केल्या.
पुण्यातून पसार झाल्यानंतर गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता) कोल्हापूरला गेला. कोल्हापूरच्या अलीकडे त्याने मोटार लावली. अज्ञात इसम तसेच आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘नंबरप्लेट’ची विल्हेवाट लावल्याचे उघड झाले. त्यामुळे पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (ता. १०) न्यायालयात दिली. आरोपींनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिस निरिक्षक (गुन्हे) विजय ठकार तपास करीत आहेत.
कोठडीत वाढ
गौरवच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केटयार्ड) यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील योगेश कदम यांनी युक्तिवाद केला. ‘गुन्हा करण्यापूर्वी आरोपी कुठे गेले, त्यांनी कोणत्या ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन केले, त्यांनी कुठे मद्यप्राशन केले याची माहिती आरोपींकडून घ्यावयाची आहे. गुन्हा केल्यानंतर गौरव मोटारीतून कसा, कोणत्या मार्गे आणि कुणासोबत परत आला याचा तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यात व गुन्हा केल्यावर पळून जाण्यात त्याला कुणी मदत केली याची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी,’ असा युक्तिवाद त्यांनी केला.
बचाव पक्षातर्फे ॲड. पुष्कर दुर्गे यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी गौरवच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ केली. भाग्येशची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
---
आरोपींना नेले घटनास्थळी
सोमवारी दोन्ही आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले होते. घटना नेमकी कशी घडली, त्यात आरोपींची काय भूमिका होती, याचा तपास पोलिस करीत आहेत. घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली, अशी माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.