जन शिक्षण संस्थानतर्फे विविध कौशल्य स्पर्धा
पुणे, ता. १२ : केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय पुरस्कृत जन शिक्षण संस्थान, पुणे च्या वतीने आंबेगाव येथे जागतिक महिला दिन व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला १५० महिलांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून रूपाली धनकवडे उपस्थित होत्या. यावेळी विविध कौशल्य स्पर्धा झाल्या. यातील विजेत्यांना बक्षीसे व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी जन शिक्षण संस्थानच्या अश्विनी पानसे, उषा तिरपुडे, कृष्णा कांबळे, अनिल चव्हाण यांनी सहकार्य केले, अशी माहिती जन शिक्षण संस्थानच्या संचालिका ज्योती मंडलिक यांनी दिली.
‘वंचित’ आघाडीतर्फे महिला पोलिसांचा गौरव
पुणे, ता. १२ : वंचित बहुजन आघाडीतर्फे महिला दिनानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध पोलिस ठाण्यांना भेट देऊन महिला पोलिसांना गौरविण्यात आले. यावेळी आघाडीचे प्रदेश सदस्य योगेश राजापूरकर, शहराध्यक्ष अरविंद तायडे, महिला अध्यक्ष अनिता चव्हाण, ज्योती शिंदे, रुक्मिणी धिवरे, राहुल धिवरे आदी उपस्थित होते.
गरवारे महाविद्यालयात माजी विद्यार्थिनींचा सत्कार
पुणे, ता. १२ : गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अभिनेत्री माधवी सोमण यांच्या हस्ते कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘अभिव्यक्त कलामंच जीसीसी’चे अनावरण डॉ. देसर्डा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अभिवाचन, गीत गायन, कवी कट्टा, नृत्य आदी कार्यक्रम सादर झाले. यावेळी प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, माजी विद्यार्थी संघाच्या प्रतिनिधी डॉ. सुवर्णा ढमढेरे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रियांका अभ्यंकर, हर्षद लिमये आणि शंतनू खेर यांनी केले.
पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रेश्मा भोसले
पुणे, ता. १२ : दिवंगत आमदार शिवाजीराव भोसले यांनी स्थापन केलेल्या पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली. अध्यासी अधिकारी बी. एल. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशनच्या अध्यक्षपदी रेश्मा भोसले, उपाध्यक्षपदी श्यामराव हुलावळे व मानद सचिवपदी संतोष भेगडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. भोसले या माजी नगरसेविका असून सहकार तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले आहे. हुलावळे हे हिंजवडीचे माजी सरपंच असून भेगडे हे ‘पीएमआरडीए’चे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंगचा पदवीप्रदान
पुणे, ता. १२ : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग येथे शपथ विधी आणि पदवीप्रदान समारंभ उत्साहात झाला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गुजरातमधील सँड्रा श्रॉफ कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य सॅम्युअल फर्नांडिस आणि भारतीय प्रशिक्षित नर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष राजाभाऊ राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ज्योती नाईकरे होत्या. सूत्रसंचालन तेजश्री मुळे यांनी केले तर शीतल बारदेशकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.