पुणे, ता. १२ ः शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याच कारणामुळे आज मॉडेल कॉलनीतील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात येऊन विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांच्याकडे कैफियत मांडली. पुढच्या चार दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
पुणे शहराच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून अघोषित पाणी कपात सुरू असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. कोथरूडमधील कर्वे रस्ता, पौड रस्ता, एरंडवणे, पटवर्धन बाग, नळ स्टॉप, विधी महाविद्यालय रस्ता, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, जनवाडी, गोखलेनगर या भागात कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होत आहे. प्रशासनाने पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात पाणीटंचाई निर्माण झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच आज मॉडेल कॉलनीतील अनेक सोसायट्यांमधील, बंगल्यांमधील ज्येष्ठ नागरिक, महिलांनी महापालिकेत येऊन त्यांची तक्रार केली.
भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे चिटणीस रविराज यादव म्हणाले, ‘‘वारंवार तक्रारी करूनदेखील पाणी येत नसल्याने आज अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले आहे. जर चार दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलन केले जाईल.’’
पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘‘नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन पुढील चार दिवसांत पुरवठा सुरळीत केला जाईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.