पुणे, ता. १२ ः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यात गेल्या बारा दिवसांमध्ये २१ हजार २५९ घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून मोहीम स्वरूपात भूमिपूजन कार्यक्रम घेण्याच्या सूचना तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात तीन हजार घरकुलांचे बांधकामही सुरू झाले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार ६८५ मंजूर घरकुलांचे विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि लाभार्थ्यांना प्रोत्साहन मिळून बांधकामास गती देण्यासाठी एक मार्चपासून विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मुख्यमंत्री शंभर दिवस उपक्रमांतर्गत घरकुलांची बांधकामे सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले होते, तसेच ज्या घरांची बांधकामे सुरू झाली नाहीत, अशा घरांची बांधकामे पुढील आठ दिवसांत सुरू करण्याच्याही सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. पुणे जिल्ह्यासाठी ३३ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्रातील २० लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप, तर १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २४ हजार २६८ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा १५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यातून एकूण ३६ कोटी ४० लाख वीस हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, तर उर्वरित लाभार्थ्यांची खातेपडताळणी सुरू असून, लवकरच त्यांनाही निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.