पुणे, ता. ९ : ऋतू बदलत असताना त्वचेला बदलणाऱ्या तापमानाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. जशी उन्हाळ्याची सुरुवात होते, तसतसे तीव्र उष्णतेमुळे त्वचा व डोळ्यांवर त्याचा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. डोळे व त्वचेचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यायला हवी, असा सल्ला त्वचा व नेत्रतज्ज्ञांनी दिला.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते. त्याने त्वचा कोरडी होणे, भेगा पडणे, खाज येणे ही लक्षणे दिसतात. या ऋतूमध्ये सोरायसिस आणि इसब यांसारख्या त्वचेच्या समस्याही वाढू शकतात. अतिउष्णतेमुळे घाम साचल्याने काखेत, छातीच्या खाली, जांघेमध्ये जंतुसंसर्ग होऊ शकतो. उन्हात फिरून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये सूर्यकिरणांचा विपरीत परिणाम आणि त्वचा काळवंडणे असे दुष्परिणाम होऊ शकतात. नवजात बालकांना घट्ट गुंडाळल्याने किंवा प्रौढांनी घट्ट कपडे घातल्याने तीव्र खाज सुटणे किंवा घामोळ्या येऊ शकतात. समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेल्यावर जास्त उन्हात पोहल्यास त्वचेचा कोरडेपणा वाढतो, चटके (सनबर्न) बसण्याची शक्यता वाढते.
२०-२०-२० चा नियम पाळा
उन्हामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. त्यासाठी २०-२०-२० चा नियम वापरा. संगणक २० मिनिटे पाहिल्यानंतर २० सेकंदांसाठी आपले डोळे बंद करा आणि त्यानंतर २० सेकंदांसाठी खिडकीतून दूर अंतरावर असणाऱ्या गोष्टी पाहा. त्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला.
काय दक्षता घ्याल?
१) सूर्यप्रकाशाच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी नियमितपणे सनस्क्रीन लावणे
२) सूर्यकिरणांपासून बचाव करणारा कोट, टोपी आणि गॉगल घालावा
३) आंघोळीनंतर मॉइश्चरायझरचा वापर केल्याने कोरडेपणा दूर होतो
४) उन्हाळ्यात जीन्स, घट्ट कपडे घालणे टाळावे
५) या ऋतूत रसाळ फळे, लिंबूवर्गीय फळे, नारळपाणी त्वचेसाठी फायदेशीर असते
घराबाहेर जाताना...
१) दररोज आठ ग्लास पाणी प्या
२) घराबाहेर जाताना टोपी व चांगला गॉगल वापरा, डोळे चोळणे टाळा
३) डोळे कोरडे पडत असल्यास नेत्ररोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने ड्रॉप्सचा वापर करा
उन्हाळ्यात जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आजाराच्या स्वरूपानुसार त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधे घ्यावीत. प्रतिबंधासाठी सैल, सुती, फिकट रंगाचे कपडे घालावेत.
- डॉ. धनश्री भिडे,
त्वचारोग चिकित्सा विभागप्रमुख, केईएम रुग्णालय
वाढते तापमान, प्रदूषण, धूळ, कोरडी हवा आणि इतर पर्यावरणीय घटकांचा आपल्या डोळ्यांवर थेट परिणाम होत आहे. अश्रू ग्रंथी डोळ्यांच्या पृष्ठभागावर समान पद्धतीने पसरलेल्या असतात. या ग्रंथी प्रभावित होतात, तेव्हा अश्रूंचा समान प्रसार होण्यास अडथळा येतो. ज्यामुळे डोळ्यांत कोरडेपणा, खाज सुटणे, जळजळ आणि थकवा जाणवतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक दक्षता घ्यायला हवी.
- डॉ. सुचेता कुलकर्णी,
वैद्यकीय संचालक, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.