पुणे, ता. २५ : पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सुरवात होत असून लाखो गणेशभक्तांच्या बंदोबस्तासाठी पुणे पोलिस दलाने जय्यत तयारी केली आहे. पोलिस कर्मचारी, होमगार्ड, केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या जवानांसह एकूण साडेआठ हजार जणांचा तगडा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऐतिहासिक परंपरा लाभलेला गणेशोत्सव शहरात व खासकरून मध्यवर्ती भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या उत्सवामध्ये पुणे शहर, ग्रामीण भाग, तसेच इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर भाविक शहरात येत असतात दररोज लाखो भाविक येथे गर्दी करत असतात. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पुणे पोलिस दलावर असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येतो. गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी ६ हजार २८२ पोलिस कर्मचारी, १ हजार १०० होमगार्ड, एक केंद्रीय राखीव पोलिस बलाची (सीआरपीएफ) एक कंपनी यांचा पहारा असणार आहे. त्याचबरोबर, १६ स्ट्रायकिंग पथके, १४ जलद प्रतिसाद पथके, ७ बॉम्ब शोधक व नाशक पथके यांचीही मदत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिस अधिकारी यांच्यामध्ये ६१८ सहायक व पोलिस उपनिरीक्षक, १५४ पोलिस निरीक्षक, २७ सहाय्यक पोलिस आयुक्त, १० पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवला जाईल.
आवाजाची मर्यादा तोडल्यास कारवाई
ध्वनीक्षेपकाला रात्री दहावाजेपर्यंत परवानगी आहे. त्याव्यतिरिक्त ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर व ६ सप्टेंबर असे ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी आहे. दररोज रात्री दहा वाजता व पुन्हा १२ वाजता आवाजाची मर्यादा पोलिसांकडून मोजली जाणार असून त्यामध्ये कोणत्याही मंडळाने आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास किंवा सूट दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त ध्वनीक्षेपक लावल्यास त्यांच्यावर ध्वनिप्रदूषण नियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
गुन्हे प्रतिबंधासाठी उपाययोजना
शहरात गुन्हे प्रतिबंधासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये सोनसाखळी चोरी विरोधी पथक, मोबाईल चोरी विरोधी पथक, वाहन चोरी विरोधी पथक, महिला व बाल सुरक्षा छेडछाड विरोधी पथक अशी पथके तैनात केली आहेत. त्यासाठी गुन्हे शाखेचे सहा पोलिस निरीक्षक, ३२ सहायक निरीक्षक व २५३ पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.
मेट्रो स्टेशनवर बंदोबस्त
शहरातील मेट्रोचे विस्तारीकरण झाले असून यंदा कसबा पेठ, मंडई या मध्यवर्ती भागात स्टेशनमध्ये वाढ झाली आहे. त्याचा वापर करून अंदाजे ५ ते ७ लाख भाविक दररोज येतील असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रवाशांच्या गर्दीच्या व आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.
यंदाचा गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होत असून त्यानुसार सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सर्व महत्त्वाच्या गणेश मंडळांना एक लायझनिंग अधिकारी दिला आहे. त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती गोळा केली असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिस दक्ष असतील.
- अमितेश कुमार, पुणे पोलिस आयुक्त
असा आहेत उपाययोजना
- वरिष्ठ पोलिस, पोलिस कर्मचारी, सीआरपीएफ जवान, होमगार्डसह आठ हजार जणांचा बंदोबस्त
- फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० ठिकाणी वॉच टॉवर उभारणी
- परिमंडळ, विभागीय स्तरावर व चौकी स्तरावर पोलिसांचे पेट्रोलिंग
- महत्त्वाच्या गणपती मंडळाच्या गर्दीच्या ठिकाणी पोलिस मदत केंद्र
- २७ ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी मद्यविक्री बंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.