पुणे, ता. २५ : खराडीतील ड्रग पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप डिलीट करून महत्त्वाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीला जामीन दिल्यास तो पुराव्यांची छेडछाड करू शकतो, असे कारण देत पोलिसांनी सोमवारी (ता. २५) न्यायालयात त्यांचे लेखी म्हणणे सादर केले. याद्वारे त्यांनी खेवलकरांच्या जामिनास विरोध दर्शवला आहे.
खेवलकरांच्या वतीने त्यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर न्यायालयाने पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयात म्हणणे सादर केले. त्यामध्ये म्हटले आहे की, या तपासादरम्यान खेवलकरांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले होते व त्यापैकी एका मोबाईलमधील सीम कार्ड हे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांकडून या मोबाईलचा तांत्रिक पंचनामा सुरू असतानाच, सीम कार्डच्या मूळ मालकाने जळगावमध्ये टेलिकॉम कंपनीकडे ‘सीम कार्ड हरवले आहे,’ असे सांगत नवीन सिमकार्ड मिळवले. हे नवीन सिमकार्ड नंतर दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून व्हॉट्सॲप सुरू केले. या व्हॉट्सॲपमधून आवश्यक ती माहिती घेतल्यानंतर त्याने ती तत्काळ डिलीट करून टाकत आरोपींकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होते.
गुन्ह्यात कलमे वाढण्याची शक्यता
पोलिस तपास सुरू असतानाच व्हॉट्सॲपद्वारे माहिती डिलीट केल्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आणखी कलमे वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपींची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. पुराव्यांशी छेडछाड करण्याच्या प्रकरणात खेवलकरांच्या निकटवर्तीयांसह काही जणांचा समावेश असून पोलिसांकडून त्याचा तपास केला जात असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.