पुणे, ता. २ : ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून मंगळवारपासून ‘‘मी फिट, माझी शाळा फिट’’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यामाध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याची फिटनेस तपासणी करण्यात येत असून साडेआठ हजार विद्यार्थ्यांचा ‘डाएट प्लॅन’ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीची वैज्ञानिक तपासणी करून त्यांना योग्य व्यायाम, आहार आणि क्रीडा संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच मुले शारीरिक व्याधींना बळी पडत असल्याचे लक्षात घेऊन ही संकल्पना जिल्हा परिषद प्रशासनाने पुढे आणली आहे. हा उपक्रम सुरू झाला असून, २ ऑक्टोबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची फिटनेस तपासणी करून त्यांच्या फिटनेसवर आधारित वैयक्तिक आहार आणि व्यायामाचे नियोजन करण्यात येणार आहे. निरोगी आयुष्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची जीवनशैली विकसित करणे हे या उपक्रमाचे ध्येय असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. ‘फिट इंडिया’ या अभियानामध्ये शाळांची नोंदणी केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना लाभ
या उपक्रमामुळे मुलांना नियमित व्यायामाची सवय लागेल. स्पर्धांच्या माध्यमातून संघभावना, क्रीडा आणि आत्मविश्वास वाढेल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य आहार घेतल्यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य अधिक सक्षम होईल. जिल्हा परिषद शाळेतील मुलांना अद्ययावत क्रीडा साधने उपलब्ध होणार आहेत.
कर्मचाऱ्यांचीही फिटनेस तपासणी
‘मी फिट, माझी शाळा फिट’ या उपक्रमासोबतच जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही फिटनेस तपासणी केली जाणार आहे. परिणामी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाइलमध्येच आहार, व्यायामाची सर्व माहिती उपलब्ध होईल.
नक्की काय करणार?
१) विद्यार्थ्यांची मोबाईल ॲपच्या साहाय्याने फिटनेस तपासणी होणार
२) शाळांमध्ये व्यायामशाळा व खेळाची मैदाने उपलब्ध करून दिली जाणार
३) तपासणीच्या आधारे वैयक्तिक आहार व व्यायामाचे नियोजन दिले जाईल
४) शिक्षकांचीही वार्षिक आरोग्य तपासणी करून शाळेतील एकूणच आरोग्यदायी वातावरणावर भर देणार
५) प्रत्येक शाळेत डिजिटल डॅशबोर्ड बसवला जाणार असून विद्यार्थ्यांच्या फिटनेस प्रगतीचा आलेख त्यावर दिसणार
६) प्रत्येक आठवड्याला क्रीडा तास आणि विविध फिटनेस स्पर्धा आयोजित केल्या जाणार
दृष्टिक्षेपात...
१९६
- उपक्रमासाठी निवडलेल्या शाळा
इयत्ता पाचवी ते आठवी
- कोणते विद्यार्थी
८ हजार ५००
- विद्यार्थी संख्या
१ हजार
- शिक्षक संख्या
आजच्या पिढीचे आरोग्य हे उद्याच्या देशाच्या विकासाशी जोडलेले आहे. त्यामुळेच हा उपक्रम केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष मैदानात यशस्वी व्हावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. या उपक्रमाचा साडेआठ हजार विद्यार्थ्यांना फायदा होईल. त्याचबरोबर गुणवत्तावाढीसाठी देखील याचा फायदा होईल.
- गजानन पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.