पुणे, ता. ४ : यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस प्रशासनाने प्रत्येक मंडळास दोन ढोल-ताशा पथकांना परवानगी देत एका पथकातील सदस्य संख्या ६० पर्यंत मर्यादित ठेवली आहे. मात्र, ‘एका पथकात ६० सदस्य संख्या ही कमी असून, आवश्यकतेनुसार संख्या ठेवण्यात येईल,’ अशी भूमिका ढोल-ताशा महासंघाने घेतली आहे. त्यामुळे एका पथकात नेमकी किती सदस्य संख्या असेल, हे गुलदस्तातच राहिले आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस सहआयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सदस्यसंख्येबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने मिरवणुकीत एका ढोल-ताशा पथकातील सदस्य संख्या ६० पर्यंत मर्यादित राहील, असे जाहीर केले होते. याबाबत ढोल-ताशा महासंघाने हा निर्णय अमान्य असल्याचे सांगत एका पथकात १५० ते २०० सदस्यांची उपस्थिती राहील, असा पवित्रा घेतला होता.
या संदर्भात बुधवारी (ता. ४) विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांच्यासमवेत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. वादकांसोबत अग्रभागी ध्वज पथक, झांज पथक, टिपरी, लेझीम आदी पारंपरिक खेळांचे पथक सहभागी होतात. त्यासाठी अतिरिक्त सदस्यांची आवश्यकता असते. त्यामुळे एका पथकात ६० ही संख्या निश्चितच नसेल, असे ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी स्पष्ट केले.
ढोल-ताशा पथके समाधान चौकापासून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील आणि मिरवणूक अलका टॉकीज चौकात समाप्त होईल. वाद्यांच्या वाहतुकीसाठी टेम्पोचा वापर करण्यात येणार असून, मिरवणूक संपल्यानंतर वाद्ये लक्ष्मी रस्त्याने परत न नेता केळकर रस्ता किंवा कुमठेकर रस्त्याने आणण्यात येतील. समाधान चौक आणि शगुन चौकात महासंघाचे स्वयंसेवक पोलिस प्रशासन, गणेश मंडळे व ढोल-ताशा पथकांमध्ये समन्वय साधतील. यासाठी त्यांना महासंघाची ओळखपत्रे देण्यात आली आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले.
शहराच्या मध्यवर्ती भागात विसर्जन मिरवणुकीत नागरिकांची प्रचंड गर्दी असते. अशा वेळी चेंगराचेंगरीसारखे प्रकार घडू नयेत, यासाठी एका ढोल-ताशा पथकात ६० सदस्यांची मर्यादा निश्चित केली आहे. एका पथकात १५०-२०० सदस्य ठेवल्यास इतर नागरिकांना अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे ढोल-ताशा पथकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
- रंजनकुमार शर्मा,
पोलिस सहआयुक्त, पुणे शहर
एका ढोल-ताशा पथकामध्ये ६० ही सदस्य संख्या नक्कीच नसेल. परंतु ती संख्या आवश्यकतेनुसार असेल. महासंघाची भूमिका संघर्षाची नसून, सामंजस्याची आहे. आमचे पोलिस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य राहील. चारही प्रमुख रस्त्यांवरील विसर्जन मिरवणूक प्रवाही राहावी, यासाठी पथके प्रयत्नशील राहतील.
- पराग ठाकूर
अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.