पुणे, ता. ४ ः पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. आज (ता. ४) शेवटच्या दिवशी तब्बल २ हजार ८९९ हरकती, सूचना निवडणूक शाखेकडे सादर झाल्या आहेत. एकूण हरकतीचा आकडा ५ हजार ४९६ इतका झाला आहे. यात प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बुद्रूक येथून सर्वाधिक २ हजार ६६ हरकती, सूचना नोंदविल्या गेल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत आकड्यांची जुळवाजुळव सुरु असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर झाली. त्यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली. सुरवातीच्या १० दिवसात फक्त ५८५ हरकती व सूचना नोंदविल्या गेल्या होत्या. या प्रभाग रचनेवर राजकीय कार्यकर्त्यांचे अनेक आक्षेप आहेत. ही प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने झाली आहे, असे त्यांना वाटत होते पण हरकती नोंदविण्याचे प्रमाण अगदी नगण्य असल्याने याकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात हरकती व सूचना नोंदविण्याचे प्रमाण वाढले आहे.
प्रभाग तयार करताना प्रमुख रस्ते, उड्डाणपूल, नदी, नाले या नैसर्गिक हद्दी ओलांडण्यात आल्या आहेत. तसेच विनाकारण प्रभागातील भाग तोडून, तो दुसऱ्या प्रभागाला जोडल्याचे प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन- जयजवाननगर, प्रभाग क्रमांक ५ येरवडा-गांधीनगर, प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू रुग्णालय-रास्ता पेठ, प्रभाग क्रमांक ३८ आंबेगाव-कात्रज, प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बुद्रूक यासह अन्य प्रभागात असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे त्याविरोधात हरकती नोंदविल्या आहेत. मांजरी बुद्रूकच्या प्रभागाला वडगाव शेरी मतदारसंघाचा काही भाग जोडला गेला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनीही हरकती नोंदविल्या आहेत.
आज (ता. ४) दुपारी तीनपर्यंत हरकती-सूचना नोंदविण्याची मुदत होती. १५ क्षेत्रीय कार्यालये व निवडणूक शाखेचे कार्यालय अशा १६ ठिकाणी ५ हजार ८४३ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. त्यातील १८०० हरकती या निवडणूक कार्यालयाकडे नोंदविल्या गेल्या आहेत.
तीन प्रभागात शून्य हरकती
एकीकडे प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस पडत असताना तीन प्रभागांमध्ये शून्य हरकती आल्या आहेत. ही प्रभाग रचना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना व नागरिकांना सोयीची असल्याचा अर्थ यातून काढता येऊ शकतो. प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई, प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना- हॅपी कॉलनी, प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर- हिंगणे होम कॉलनी या तीन प्रभागात एकही हरकत आलेली नाही. तर याच शेजारील प्रभाग क्रमांक ३१ मयूर कॉलनी-कोथरूड या प्रभागातून केवळ एक हरकत नोंदविली गेली आहे.
या प्रभागात सर्वाधिक हरकती
प्रभाग क्रमांक ३ विमाननगर-लोहगावमध्ये ८१९, प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रूक-साडेसतरानळी येथून ५५८ आणि प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बुद्रूक येथून २ हजार ६६ हरकती प्राप्त झाल्या आहेत तर १५ क्षेत्रीय कार्यालयांमधून धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून सर्वाधिक १ हजार ८९९, नगररस्ता-वडगावशेरी येथून १ हजार २६८ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आणि वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातून सर्वात कमी प्रत्येकी ९ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत.
हरकती सूचनांवर होणार सुनावणी
प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. मात्र, पुणे महापालिकेतर्फे त्याचे वेळापत्रक व ठिकाण निश्चित झालेले नाही. शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांना ५ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधी सुनावणी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे लवकरच सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करावे लागणार आहे.
अशा नोंदविल्या गेल्या हरकती
तारीख - हरकतीची संख्या
२२ ऑगस्ट - ०
२३ ऑगस्ट - ५
२४ ऑगस्ट - ०
२५ ऑगस्ट - १६५
२६ ऑगस्ट - ४२
२७ ऑगस्ट - ३८
२८ ऑगस्ट - १०३
२९ ऑगस्ट - ५०
३० ऑगस्ट - ५१
३१ ऑगस्ट- २८
१ सप्टेंबर -११५
२ सप्टेंबर - ९४१
३ सप्टेंबर - १०५९
४ सप्टेंबर - २८९९
एकूण - ५४९६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.