पुणे, ता. ५ : गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळाकडून ढोल-ताशे, ध्वनिवर्धक (डीजे) आणि लेजर लाइट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र या कृत्रिम प्रकाशयोजना व प्रचंड आवाजामुळे डोळे व कानाचे गंभीर आजार उद्भवण्याचा धोका असल्याचा इशारा नेत्ररोगतज्ज्ञ व कान-नाक-घसा तज्ज्ञांनी दिला आहे.
कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या मते ध्वनिवर्धक व प्रचंड आवाजाचा परिणाम थेट कानांच्या पडद्यावर व श्रवणशक्तीवर थेट परिणाम करतात. यामध्ये ८५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज कानातील पडद्याला हानी पोहोचवतो. यामुळे कानात सतत आवाज येणे, कमी ऐकू येणे किंवा तात्पुरता बहिरेपणा येण्याची शक्यता दाट असते. मिरवणुकीनंतर अनेकजण डॉक्टरांकडे या तक्रारी घेऊन जाताना दिसतात. सातत्याने उच्च आवाजात राहिल्यास काही वर्षानंतर कायमस्वरूपी श्रवणदोष होऊ शकतो, अशी माहिती ससून रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. राहुल तेलंग यांनी दिली.
नेत्रतज्ज्ञांच्या मते लेजर लाइट्सचा सरळ डोळ्यांवर, रेटिनावर परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांत जळजळ होणे, अस्पष्ट दिसणे, डोळ्यांत पाणी येणे, दुखणे तसेच दीर्घकाळ संपर्क आल्यास दृष्टिदोष होण्याची शक्यता असते. गेल्यावर्षी लेजर लाइटने एका तरुणाची दृष्टी अधू झाली होती. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आधीपासून डोळ्यांचे आजार असलेल्यांना विशेष धोका असतो, अशी माहिती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांनी दिली.
अशी घ्या काळजी...
१) मिरवणुकीत थेट लेजर लाइट्सकडे पाहू नका
२) लहान मुलांना लेजर शो व प्रखर लाइट्सपासून दूर ठेवा
३) ध्वनिवर्धकाच्या अतिप्रचंड आवाजापासून अंतर राखा
४) शक्य असल्यास कानात इअरप्लग्स किंवा कापूस घाला
५) डोळे लालसर होणे, दुखणे किंवा दिसण्यास अडचण आल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या
६) कानात आवाज, वेदना किंवा ऐकण्यास कमी जाणवल्यास कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे जा
जास्त वेळ ऐकण्यासाठी सुरक्षित ध्वनी मर्यादा ७० डेसिबल किंवा त्यापेक्षा कमी आहे. उच्च डेसिबल पातळीच्या आवाजाने डोकेदुखी, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव असे परिणाम होतात. काहींमध्ये तर कानाच्या पडद्याचे नुकसान झाल्याने अचानक श्रवणशक्ती कमी होऊ शकते. जर एका आठवड्यात उपचार केले तर बरे होण्याची शक्यता सुमारे ७० टक्के असते, परंतु दीर्घकाळ अशा आवाजाच्या संपर्कात राहिल्याने बहिरेपणा येऊ शकतो. हेडफोनची आवश्यकता असेल तर आवाज कमी असणारे निवडा.
- डॉ. शालिनी सक्सेना,
वरिष्ठ कान-नाक-घसा तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.