आर्ट कॉर्नर
नीला शर्मा
‘‘हे विधात्या, मी स्वतः नाचलो की, नाचवला गेलो?, मी स्वतः खेळलो की, खेळवला गेलो?,’’ कृष्णाचा हा आक्रोश त्याच्या मानव अवतारातील भावनांचे दर्शन ‘वेणुगान’ या अत्यंत तरल नृत्यात्मिकेतून घडले. प्रसिद्ध भरतनाट्यम कलावंत वैभव आरेकर यांनी रंगनृत्य प्रकारातून हा भावगर्भ आविष्कार घडवला. नृत्य आणि संवादांची सांगड घालत त्यांनी अद्भूत परिणाम साधला.
अलीकडेच कोथरूडमधील ‘द बॉक्स’च्या समीप रंगमंचावर कृष्णाच्या मनातील दुखरी बाजू नृत्यनाट्यातून उमगली.
शतकानुशतके भारतीय संस्कृतीतील लोकजीवनात अढळ स्थान मिळालेल्या कृष्णाच्या जीवनकथेतील विविध प्रसंग
निरनिराळ्या कलाकृतींमधून आपण अनुभवत असतो. त्यांत बाललीला, तरुणपणीच्या कृष्णाची गोपिकांसोबतची रासक्रीडा, राधेबरोबरचे प्रेमप्रसंग अशा काही कोमल रूपांप्रमाणेच अर्जुनाला युद्धासाठी प्रेरित करणारा धीरगंभीर, धोरणी व तत्त्वज्ञानी युगपुरुषही दिसतो. परंतु मनुष्यदेहातील कृष्णाच्या अंतरंगात संघर्षाच्या प्रत्येक प्रसंगी काय खळबळ माजली होती, त्याचा विचार फारसा केलेला दिसत नाही. वास्तवदर्शी कलाकृती निर्मिणाऱ्या काही विरळा कलावंतांनी कृष्णाच्या मानसिक ताणतणावांची कल्पना मांडलेली दिसते. त्यांपैकी एक असलेले प्रा. वसंत देव यांच्या हिंदी संहितेवर आधारित ही प्रस्तुती आहे.
आरेकर यांच्या प्रवाही नृत्य व उत्कट संवाद प्रस्तुतीतून कृष्ण जणू आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतो आहे, असे प्रकर्षाने जाणवते. जरासंध व कंसवधाचे प्रसंग, खांडववन जाळण्यामागचे राजकीय डावपेच, राधेसोबत अद्वैत अनुभवण्याचा लोभ जडूनसुद्धा कर्तव्यपूर्तीसाठी तिचा सोसावा लागलेला विरह, यशोदामातेच्या हातून लोण्याचा गोळा मिळण्यासाठी केलेली विनवणी, यांसारख्या अनेक प्रसंगांमधून कृष्ण त्याच्या मनात राहून गेलेल्या अनेक गोष्टी
व्याकूळ होऊन सांगत जातो. ‘‘या सगळ्यांसाठी माध्यम म्हणून माझीच निवड का केलीस,’’ असा जाब तो विधात्याला विचारतो.
सांख्य डान्स कंपनीच्या या निर्मितीसाठी सुशांत जाधव यांनी दिग्दर्शन, वेशभूषा व नेपथ्य प्रकाश योजनेची जबाबदारी मेहनतीने पेलली आहे. सतीश कृष्णमूर्ती यांचे संगीत दिग्दर्शन या कलाकृतीला कमालीच्या उंचीवर नेते. श्री वल्लभाचार्य, जयदेव, व्यासरया तीर्थ यांच्या पदरचनांचे कार्तिक हेब्बार यांनी केलेले गायन गहिरा परिणाम साधते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.