पुणे, ता. ५ : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) चौथ्या प्रवेश फेरीत १७ हजार ६७५ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संस्था मिळाल्या आहेत. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवार (ता. ६) ते रविवार (ता. १०) पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत ऑगस्ट २०२५ या सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया पद्धतीने करण्यात येत आहेत. राज्यातील एक लाख ५० हजार २८ जागांसाठी तीन प्रवेश फेऱ्या राबविण्यात आल्या. यात केंद्रीय प्रवेश फेरीसाठी (कॅप) शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून एक लाख ३९ हजार ४९३ जागा आहेत. आता चौथ्या फेरीत १४ हजार ८१२ विद्यार्थ्यांना शासकीय, तर दोन हजार ८६३ विद्यार्थ्यांना खासगी आयटीआयमध्ये प्रवेश मिळाले आहेत.
चौथ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची कार्यवाही करणे, विद्यार्थ्यांनी पसंतीक्रमाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करण्यासाठी ६ जे १० ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे.
ईव्ही आणि सौरऊर्जेवर नवा अभ्यासक्रम
राज्यातील आयटीआयमध्ये भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेइकल आणि सोलर टेक्निशन (इलेक्ट्रिक) अभ्यासक्रमांच्या नवीन तुकड्या सुरू करण्यात येत आहेत. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने जगभरात वाढणारी जागरूकता, केंद्र आणि राज्य सरकारच्या हरित ऊर्जा धोरणांमुळे या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विशेष फेरी आयोजित करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत आयटीआयमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनाही विशेष प्रवेशफेरीत संधी देण्यात येत आहे.
पाचव्या फेरीची प्रवेशप्रक्रिया
कालावधी : तपशील
- ६ ते १० ऑगस्ट : ऑनलाइन पद्धतीने व्यवसाय आणि संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे, नवीन अभ्यासक्रमासाठी विकल्प आणि प्राधान्यक्रम सादर करणे.
- १२ ऑगस्ट : गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे.
- १३ ऑगस्ट : संस्था आणि व्यवसायनिहाय निवड यादी प्रसिद्ध करणे, विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविणे.
- १४ ते १९ ऑगस्ट : निवड झालेल्या संस्थेत विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे.
प्रवेशाची आकडेवारी
तपशील : शासकीय आयटीआय : खासगी आयटीआय : एकूण
‘कॅप’ अंतर्गत प्रवेशाच्या जागा : ९६,७३६ : ४२,७५७ : १,३९,४९३
संस्थांस्तरीय फेरीसाठी जागा : ००० : ९,२९५ : ९,२९५
अल्पसंख्याक कोट्यातील जागा : ०००० : १,२४० : १,२४०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.