पुणे, ता. २० ः पुणे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या सुमारे १० हजार कंत्राटी कामगारांची यंदाची दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे. या कामगारांना ८.३३ टक्के बोनस देण्यास महापालिका आयुक्तांच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या मागणीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील अंतिम आदेश पुढील काही दिवसांत निघणार आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून महापालिकेतील कंत्राटी कामगारांना दिवाळीत बोनस मिळाला पाहिजे, अशी मागणी विविध कामगार संघटनांकडून केली जात आहे. त्यासाठी आंदोलने, उपोषणही झाले आहे; पण महापालिकेचे अधिकारी व ठेकेदाराकडून बोनस देण्यास टाळाटाळ केली जात आहे. कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी (ता. १९) कामगार संघटनांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, कामगार सल्लागार नितीन केंजळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक, उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे, शासनाच्या कामगार विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त गजानन शिंदे आदी उपस्थित होते. त्यामध्ये कंत्राटी कामगारांना बोनस देण्यासंदर्भातील कायदेशीरबाबी तपासण्यात आल्या. कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे बोनस देय असून त्यांना बोनस दिला पाहिजे, त्याचबरोबर या कामगारांना राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या यादेखील कायद्याप्रमाणे देय आहेत, असे या बैठकीत सहाय्यक कामगार अधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर कंत्राटी कामगारांना बोनस मिळाला पाहिजे, हे आयुक्तांनी मान्य केले. या कर्मचाऱ्यांना महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे ८.३३ टक्के बोनस मिळावा देण्यासंदर्भात तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना जवळपास पगाराला पगार एवढा बोनस मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढील काही दिवसांत अंतिम आदेश निघणार असून, त्यात ठेकेदाराने कंत्राटी कामगारांच्या थेट बँक खात्यात दिवाळीपूर्वी बोनस जमा करावा, असे सांगितले जाणार आहे.
अशी आहे स्थिती
- पुणे महापालिकेतील वर्ग तीन आणि वर्ग चारमधील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर तेथील जागा भरल्या न गेल्याने तेथे कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते
- यात झाडण काम करणारे, सुरक्षा रक्षक यांची मोठी संख्या
- आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विभाग, पाणीपुरवठा, पथ, मोटर वाहन, सुरक्षा विभाग, विद्युत, मंडई, सांस्कृतिक केंद्र, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, अग्निशामक दल येथेही कुशल, अर्धकुशल कंत्राटी कामगार नियुक्त केले जातात
- या कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या १० तारखेच्या आत पगार करावा, १५ ऑगस्ट २६ जानेवारी, एक मे रोजीच्या शासकीय सुट्ट्या मिळाव्यात, दिवाळीला बोनस दिला जावा असा नियम असतानाही त्याकडे दुर्लक्ष
- कंत्राटी कामगारांसाठी महापालिका दर वर्षी किमान २०० ते २२५ कोटी रुपये खर्च करत असली तरी पिळवणुकीमुळे त्यांची अवस्था वाईट
महापालिका आयुक्तांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर घेतलेल्या बैठकीत दिवाळीला बोनस देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होईल.
- नितीन केंजळे, मुख्य कामगार सल्लागार
कंत्राटी कामगारांना दिवाळीला बोनस मिळाला पाहिजे हा त्यांचा हक्क आहे; पण महापालिका प्रशासन कायद्याचे उल्लंघन करून कामगारांचा हक्क डावलत आहे. आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत कामगारांना बोनस मिळाला पाहिजे हे मान्य करत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले. या कामगारांना ८.३३ टक्के बोनस मिळणार आहे. याबाबत अंतिम आदेश निघावा यासाठी पाठपुरावा केला जाईल. कामगारांच्या एकजुटीचा हा मोठा विजय आहे.
- सुनील शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर संघ
अन्य महापालिकेत बोनस
सुमारे १२ हजार कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या पुणे महापालिकेत
कंत्राटी कामगारांना बोनस आणि घरभाडे मिळत नाही. याउलट पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबई महापालिकेत कंत्राटी कामगारांना बोनस, घरभाडे देण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.