पुणे, ता. २० ः लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी पुण्यातील बाजारपेठा सध्या रंगीबेरंगी वस्त्रांनी फुलून गेल्या आहेत. बाप्पासाठी वेगवेगळ्या वस्त्रांचे मुबलक पर्याय उपलब्ध असून, पगड्या, मुकुट, पैठणी फेटे, उपरणे, पंचे, आकर्षक रंगातील शेले, धोतर, अंगरखा, कलाकुसरीचे शेले, क्रिस्टल उपरणे अशा असंख्य पारंपरिक तसेच डिझायनर पर्यायांची रेलचेल पाहायला मिळत आहे. तुळशीबाग, मंडई, रविवार पेठ आदी बाजारपेठांमध्ये भाविकांनी केलेल्या प्रचंड गर्दीने या खरेदीचा उत्साह दिसून आला
यंदा बाप्पासाठी काहीतरी वेगळेपण देण्यासाठी व्यापाऱ्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना लढविल्या असून शिंदेशाही, पेशवाई, मल्हारी पगड्या, पैठणीचे उपरणे, काठाचे पीतांबर, काठाचे धोतर, बांधणीचे धोतर, पैठणीचे उपरणे, पैठणी टोपी, काठाचा पंचा असे हटके पर्याय ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. मुंबई, कोलकता, बनारस येथून येणारी खास मखमली, वेलवेट, सिल्क, कॉटन व टेरिकॉट प्रकारातील वस्त्रेही लोकप्रिय ठरत असून अगदी ५० रुपयांपासून ते साडेतीन हजार रुपये किमतीपर्यंत ही वस्त्रे उपलब्ध आहेत. काही भाविक कारागिरांना खास ऑर्डर देऊन हव्या तशा पोशाखांची निर्मिती करून घेत आहेत,
प्रत्येक वस्त्राचे पाच ते दहा प्रकार उपलब्ध असल्याने खरेदीदारांना असंख्य पर्याय मिळत आहेत. बाजारपेठेतील प्रत्येक दुकान, स्टॉल व पदपथावर गणेशोत्सवाच्या उत्साहाचा पहायला मिळतोय. एकीकडे पारंपरिक फेटा, धोतर, उपरणे टिकवले जात असताना दुसरीकडे पैठणीचा साज, डिझायनर पगड्या आणि क्रिस्टल उपरण्यांनी बाप्पाच्या पोशाखाला आधुनिकतेची झळाळी दिली आहे आणि त्यामुळे पुण्याच्या बाजारपेठा खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाच्या जल्लोषात रंगल्या आहेत.
-----
‘‘यंदा बाजारपेठ खूप नवीन प्रकारचे वस्त्रे व अलंकार गणरायासाठी दिसत आहेत. आम्ही यंदा आमच्या बाप्पासाठी तीन विविध रंगाचे फेटे घेतले आहेत. खूप आकर्षक रंगांमध्ये फेटे असून ते घालण्यास सोयीचे आहेत व माफक दरात ते बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यासह मलमलचे आसन, हातातल्या आणि गळ्यातल्या माळा आम्ही घेतल्या आहेत.’’
- मधुवंती गोरे, नागरिक
‘‘यंदा कापसाच्या वस्त्रांमध्ये गणरायासाठी तसेच गौरायांसाठी विविध रंगांच्या फुलांच्या वस्त्रमाला, त्यात विविध रंग, प्रकार आले आहेत. तसेच गणरायाच्या आसनामध्ये सॅटिनचे वस्त्र, उपरणेमध्ये देखील विविध रंगाचे, आकाराचे आहेत. याची किंमत १५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहे. सध्या पावसामुळे गर्दी कमी आहे. शनिवार, रविवार मात्र बाजारपेठ नागरिकांनी तुडुंब भरत आहेत. पारंपरिक वस्त्रांमुळे मूर्ती आकर्षक दिसते. त्यामुळे वेगवेगळी वस्त्रे आम्ही घेत असतो. मूर्तीनुसार वस्त्रांची निवड केली जाते. ’’
- शरद गंजीवाले, गंजीवाले शॉपी, शनिपार चौक
----------
फोटो ः 41618, 41619, 41503, 41504
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.