पुणे, ता. २२ ः पालघर साधू हत्याकांडातील गुन्हेगार, अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपींना भाजपने दिलेल्या पक्ष प्रवेशाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शनिवारी आंदोलन करण्यात आले.
सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, अनंत घरत, राजेंद्र शिंदे, मकरंद पेटकर, अमृत पठारे, मुकुंद चव्हाण, संदीप गायकवाड, विलास सोनावणे, शशिकांत पापळ, संतोष भुतकर आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, ‘‘हत्याकांडामधील गुन्हेगार काशिनाथ चौधरी, अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपी विनोद गंगाने यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देणे हे भाजपचे हिंदुत्व आहे का? आशिष शेलार हे फक्त निवडणुकीपुरती डोक्यावर मुस्लिम टोपी घालतो. त्यामुळे त्यांचे हिंदुत्व फक्त खोटेच नव्हे, तर बेगडी आहे.’’ दरम्यान, सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली असून, त्यास महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही शिवसैनिकांनी या वेळी केला.