पुणे, ता. २४ ः बालगंधर्व रंगमंदिरापाठोपाठ सर्वाधिक पसंतीचे, वर्दळीचे आणि उपनगरांमधील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून नावलौकिक असलेले नाट्यगृह म्हणजे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह. कोथरूडसह पुण्यातील सर्वच भागांतील रसिकांच्या आणि कलाकारांच्या आवडीचे हे नाट्यगृह मंगळवारी (ता. २५) रौप्य महोत्सव साजरा करत आहे.
मध्यवर्ती भागातील केंद्र आणि दर्दी रसिक या दोन महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमुळे हे नाट्यगृह लोकप्रिय आहे. येथील नाट्यप्रयोगांना नेहमी चोखंदळ आणि दर्दी रसिकांची उपस्थिती असल्याचा अनुभव अनेक नाट्यनिर्मात्यांनी घेतला आहे. मराठी व्यावसायिक नाटकांसह अन्य भाषांमधील नाट्यप्रयोग, विविध संगीत महोत्सव, संगीत मैफिली, स्थानिक साहित्य संमेलन, पुरस्कार सोहळे अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना येथे उत्तम प्रतिसाद मिळतो.
बालगंधर्व रंगमंदिराव्यतिरिक्त कोथरूडसारख्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरातही एखादे नाट्यगृह असावे, या विचारातून १९८५च्या सुमारास या नाट्यगृहाची कल्पना पुढे आली. कोथरूड परिसरातील तत्कालीन नगरसेवक शशिकांत सुतार यांनी या संकल्पनेसाठी पुढाकार घेतला. त्यातून २८ ऑक्टोबर १९८६ ला तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या कामाची पायाभरणी झाली. २५ नोव्हेंबर २००० ला तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते नाट्यगृहाचे उद्घाटन झाले.
महत्त्वाचे
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नेहमीच कला, साहित्य-संस्कृती या क्षेत्रासाठी भरभरून मदत केली आणि प्रोत्साहन दिले. त्यांच्या सन्मानार्थ या नाट्यगृहाला ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ असे नाव देण्यात आले
- या नाट्यगृहातील पहिला कार्यक्रम १ डिसेंबरला सादर झाला
- ‘वर्षा उसगावकर म्युझिकल नाइट’ कार्यक्रमाने नाट्यगृहातील सादरीकरणांची नांदी झाली
- तेव्हापासून आजपर्यंत या नाट्यगृहाला मिळणारा प्रतिसाद वाढतच गेला
- नाट्यगृहासह यशवंतराव चव्हाण कलादालनातही नियमित कला प्रदर्शनांचे आयोजन केले जाते
पार्किंग खुली होण्याची प्रतीक्षा
नाट्यगृहाचे बांधकाम नाटकांसाठी उत्तम असून, गेल्या २५ वर्षांत किरकोळ दुरुस्त्यांव्यतिरिक्त कोणतेही मोठे बदल येथे झाले नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांत देखभालीतील त्रुटींमुळे येथील अडचणी वाढत आहेत. तसेच, पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असून नवे पार्किंग पूर्ण क्षमेतेने खुली होण्याची प्रतीक्षा आहे.
एकाच आवारात दोन नाट्यगृह
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या विस्तारीकरणांतर्गत आवारातील जागेत बाळासाहेब ठाकरे कलामंदिर बांधण्याचा निर्णय २०१५ मध्ये झाला होता. या कलामंदिरात सुमारे ४०० आसनक्षमतेचे बालनाट्यगृह आणि पहिल्या मजल्यावर कलादालनाचा समावेश आहे. या नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे; मात्र नाट्यगृहाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळालेला नाही. हे उद्घाटन झाल्यावर एकाच आवारात दोन नाट्यगृह असणारे हे महाराष्ट्रातील अभिनव ‘नाट्यसंकुल’ असेल.
नाट्यगृहाची प्रेक्षक क्षमता
तळमजला - ७३५
बाल्कनी - १५७
एकूण - ८९२
प्रशस्त तिकीट विक्री दालन, हे या नाट्यगृहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रशस्त दालनामुळे येथे अनेक दिग्गज नाट्यनिर्मात्यांनी आमच्यासोबत गप्पा मारल्याच्या आठवणी ताज्या आहेत. गेल्या २५ वर्षांतील नाट्यगृहाचा प्रवास मी पाहिला असून, नाट्य कलाकारांच्या मनातील अग्रणी नाट्यगृह म्हणून या नाट्यगृहाने स्थान मिळवले आहे.
- सत्यजित धांडेकर, नाट्य व्यवस्थापक
पायाभरणीपासून उद्घाटनापर्यंतचा नाट्यगृहाचा प्रवास मी अनुभवला. प्रत्येक कार्यक्रमाला रसिकांची गर्दी होत असल्याने अल्पावधीतच हे नाट्यगृह लोकप्रिय झाले. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, राम गबाले, प्रभाकर पणशीकर अशा अनेक दिग्गजांचे प्रयोग या रंगमंचावर सादर झाले आहेत.
- सुनील महाजन, अध्यक्ष, कोथरूड नाट्य परिषद
कोथरूड परिसरातून बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत प्रत्येक वेळी जाणे शक्य होत नाही. मात्र, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामुळे दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेणे शक्य होते. अनेक नाटकांचे पुण्यातील शुभारंभाचे प्रयोग येथे होतात, त्याचा साक्षीदार होण्याचा आनंद निराळाच आहे.
- संगीता नाईक, रसिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.