पुणे, ता. २७ : ठेकेदाराकडून डांबर खरेदी करताना महापालिकेचे प्रतिटन साडेसहा हजार ते सात हजार रुपयांचे नुकसान होत आहे. यात ठेकेदाराचे भले होत आहे तर महापालिकेच्या तिजोरीला कोट्यवधीचा खड्डा पडत आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम यांनी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भातील निवेदन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका थेट डांबर उत्पादक पेट्रोलियम कंपन्यांकडून डांबर खरेदी करत होती. पण तीन वर्षांपूर्वी ठेकेदाराकडून डांबर खरेदीचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याचे नियम व अटी ठराविक ठेकेदाराला फायदेशीर ठरतील, अशा ठेवण्यात आल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे ठरावीक ठेकेदाराला निविदा मिळाल्यानंतर त्याच्याकडून २४ ऑगस्ट २०२४ ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महापालिकेने २३०१ मेट्रीक टन डांबराची खरेदी केली आहे. ही खरेदी थेट कंपनीकडून केली असती तर महापालिकेला प्रतिटन साडेसहा हजार ते सात हजार रुपयांची सूट मिळाली असती. पण आता ही सूट ठेकेदाराला मिळत आहे. तसेच महापालिकेच्या प्रकल्पात डांबराचा ट्रक पाठविल्यानंतर पूर्ण माल उतरविलेला नाही. दहा ट्रक डांबराची चोरी झाली आहे, असा आरोप निकम यांनी केला आहे.
एकच ट्रक दोन ठिकाणी
हाच ठेकेदार महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागालाही डांबर पुरवठा करतो. पेट्रोलियम कंपन्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ॲप उपलब्ध करून दिले आहे. त्यात एकाच ट्रकने एकाच वेळी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला डांबर पुरवठा केल्याची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे हा ठेकेदार महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांपैकी एकाची फसवणूक करत आहे, असा आरोप निकम यांनी केला आहे.
डांबराच्या निविदेबाबत आयुक्तांकडे तक्रार केली असेल तर कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.