पुणे, ता. २४ ः ‘‘केंद्राने शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू ठेवत सात वर्षे उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) वाढवला आहे. मात्र, ‘एफआरपी’ अधिक वाढविल्यास साखर उद्योगातील घटकांचे नुकसान होईल. त्यामुळे आता कारखाने व शेतकरी यांचे हितसंबंध, तसेच परस्परपूरक विकास जपणारा दृष्टिकोन ठेवावा लागेल,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कृषी खर्च व मूल्य आयोगाचे (सीएसीपी) अध्यक्ष प्रा. विजय पॉल शर्मा यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष प्रताप ओहोळ, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू पाटील, ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे उपस्थित होते.
प्रा. पॉल म्हणाले, ‘‘ऊस शेतीमधील समस्यादेखील विचारात घ्याव्या लागतील. कारण, सतत पीक घेतल्याने जमिनी खराब होत आहेत. ऊस शेतीतील कीडरोगांमध्ये प्रतिकारक्षमता येते आहे. हे टाळण्यासाठी शास्त्रशुद्ध ऊस शेती, आंतरपिके, नव्या वाणांचा वापर वाढवावा लागेल. अर्थात, त्याकरिता साखर कारखाने, शेतकरी, संशोधन संस्थांना एकत्रित काम करावे लागेल.’’
पाटील म्हणाले, ‘‘साखर उद्योगाला प्रतिटन ७०० रुपये होणारा तोटा विचारात घेऊन साखर महासंघाने एक प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. त्यानुसार उसाची ‘एफआरपी’ साखरेच्या किमान विक्री दराशी (एमएसपी) जोडावी असे सुचविले आहे.’’
दांडेगावकर म्हणाले, ‘‘राज्याचा साखर हंगाम हा केवळ ८३ दिवसांवर आला आहे. यावर्षीही हंगाम शंभर दिवसांचा असेल, मात्र हाच हंगाम कालावधी १३० दिवसांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) मदत घेतली जात आहे.’’ कार्यक्रमामध्ये प्रश्नमंजूषा, घोषवाक्य, पोस्टर आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेत ५१ कारखान्यांमधील ४४९ जणांनी सहभाग घेतला होता.
-----------------
शेतीसाठी एआय वरदान
‘शेतीसह सर्व क्षेत्रांना एआय व्यापून टाकेल. या तंत्रामुळे आता इंग्लंडच्या शेतीत, जपानमधील हॉटेल व रुग्णालयांमध्ये माणूस दिसत नाही. एआयचे जगभर चांगले व वाईट परिणाम होणार असले तरी शेतीसाठी हे तंत्र वरदान ठरेल,’ असे भाकीत अच्युत गोडबोले यांनी वर्तविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.