दैनंदिन जीवनात आपल्याला अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी प्रसंगी कायद्याचीही मदत घेण्याची गरज पडते. हे लक्षात घेऊन कायदेविषयक मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘कायदा काय सांगतो?’ हे सदर सुरू करण्यात येत आहे. त्यात ॲड. जान्हवी भोसले वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.
कायदा काय सांगतो ?
प्रश्न - माझ्या आजोबांनी देवस्थानाला जमीन बक्षीसपत्रद्वारे दिली होती. बक्षीस पत्राच्या अटीप्रमाणे तीन वर्षांच्या आत मंदिर बांधून तयार होणे आवश्यक होते. परंतु आज १५ वर्ष सदर जमिनीवर कोणतेही मंदिर उभे केलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये बक्षीसपत्र रद्द करता येते का?
उत्तर: सदर बक्षीस पत्र रद्द होईल. कारण बक्षीसपत्रामध्ये नमूद केलेल्या अटीची पूर्तता झालेली नाही. यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून पुरावे सादर करून बक्षीसपत्र रद्द करून घेता येईल.
प्रश्न - मृत्युपत्र कोणी करावे व कधी करावे?
उत्तर - प्रत्येक सज्ञान व्यक्तीने मृत्युपत्र करावे. मृत्युपत्राद्वारे तुमच्या नावावर असलेल्या स्वकष्टाचे तसेच वडिलोपार्जित स्थावर व जंगम मालमत्ता तुमचे वारस किंवा इतरांना देखील देऊ शकता. जीवन कालावधीमध्ये मृत्युपत्र कितीही वेळा करता येते परंतु मृत्यूच्या आधी केले सर म्हणजेच सर्वांत शेवटी केलेले मृत्युपत्र हे कायद्यामध्ये वैद्य आहे.
प्रश्न- माझी पत्नी नोकरी करते, परंतु घटस्फोटाच्या दाव्यामध्ये माझ्या पत्नीने कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसल्याचे घोषित केलेले आहे. मी सरकारी नोकरीत असल्यामुळे माझी पगाराची पावती व नोकरीचा सर्व तपशील कोर्टाला दिलेला आहे. पत्नी नोकरी करते हे कोर्टाला कसे कळवता येईल?
उत्तर - तुमची पत्नी ज्या कार्यालयात नोकरी करते तेथील मालकाला किंवा मॅनेजरला न्यायालयामार्फत विटनेस समन्स काढता येईल. ज्यामध्ये तुमच्या पत्नीच्या नोकरीबाबतचा तपशील देणे मालकावर बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे तुमच्या पत्नीने प्रतिज्ञापत्रावर खोटी माहिती दिल्याबद्दल तुम्ही पत्नी विरुद्ध दावा देखील दाखल करू शकता.
प्रश्न - माझी पत्नी सतत मला धमकी देते की, माझ्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागेल व माझ्या आई-वडिलांना काही मिळू देणार नाही. पत्नीला पतीच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळतो का?
उत्तर - मालमत्ता कोणत्या प्रकारची आहे यावर अवलंबून आहे पतीच्या स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये पत्नीला कोणताही हिस्सा मिळत नाही. परंतु पतीचे मृत्युपत्र न करता निधन झाल्यास पतीला पत्नीच्या सर्व मालमत्तांमध्ये समान हक्क मिळतो.
प्रश्न - ‘एमआरपी’पेक्षा जास्त रुपये घेतले तर तक्रार कशी करावी?
उत्तर - छापील किमतीपेक्षा जास्त पैसे मागणी होत असल्यास किंवा जाहीर किमतीपेक्षा चढ्या दराने कोणी मालाची विक्री करीत असल्यास विक्रेत्याकडून खरेदी केल्याची पावती घेणे आवश्यक आहे. पावती घेऊन तक्रार अर्जासह आपण ग्राहक मंच लवादाकडे दाद मागू शकतो. यात विक्रेत्यास दंड किंवा शिक्षा किंवा दोन्ही, परवाना रद्द होणे, ब्लॅक लिस्टमध्ये टाकणे अशा शिक्षा आहेत.
(आपले कायदेविषयक प्रश्न वाचकांनी law@esakal.com या ई-मेलवर पाठवावेत. त्यांतील निवडक प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील. लेखकाने दिलेले उत्तर हा केवळ सल्ला असेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.