पुणे, ता. १८ : ‘‘आचार्य अत्रे व्यासंगी शिक्षक, लेखक, साहित्यिक, पत्रकार, चतुरस्र वक्ते व चित्रपट निर्माते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ते अग्रणी नेते होते. विनोदबुद्धी, कल्पकता, हजरजबाबीपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण होते. त्यांनी विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविले. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपणदेखील आपल्या कार्यकर्तृत्वाने शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’’ असे मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य सुधीर गाडे यांनी व्यक्त केले.
आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त मुलांच्या विद्यालयात अत्रे यांच्या जीवनावर गाडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सनदी लेखापाल महादेव जाधव, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मुख्याध्यापक सायसिंग वसावे आदी उपस्थित होते.
गाडे म्हणाले, ‘‘आचार्य अत्रे यांचे प्राथमिक शिक्षण सासवड येथील एम.ई.एस. हायस्कूलमध्ये झाले. १९११ साली त्यांनी पुण्यातील भावे स्कूलमध्ये (आजचे म.ए.सो. मुलांचे विद्यालय) प्रवेश घेतला. त्यांनी ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्रात संस्थेचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.’’
कोलते यांनी आचार्य अत्रे यांच्या साहित्यातील विनोदी प्रसंग सांगून त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना उलगडून दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी जोशी यांनी केले. कांचन राऊत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.