पुणे, ता. २७ : शहरात सोमवारी मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर मंगळवारी (ता. २७) दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि रिपरिप सुरू असताना दुपारच्या सुमारास शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने अचानक हजेरी लावली. हवामानातील या बदलामुळे पुणेकरांचे जनजीवन कोलमडले. अनेक भागांत रस्ते जलमय झाले, झाडे कोसळली, तर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना तासनतास अडकून राहावे लागले.
शहरात मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या पावसाने हवेत सुखद गारवा निर्माण केला होता. मात्र, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वातावरणात बदल झाल्याने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागांसह कोथरूड, बाणेर, औंध, नऱ्हे, धायरी, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता आणि हडपसर आदी परिसरातही जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या पावसामुळे विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागला. कार्यालयांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले, तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनाही वीज व इंटरनेट पुरवठ्यातील व्यत्ययामुळे त्रास सहन करावा लागला. अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक जण छत्रीविना किंवा हलक्या पावसात घराबाहेर पडले होते, त्यांना पूर्ण भिजवले. अनेकांच्या छत्र्या उलटल्या, तर काहींनी झाडाखाली उभे राहून आसरा घेतला.
रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिक त्रस्त
पावसाचे पाणी साचल्यामुळे अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. पाण्याखालील खड्डे हे दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरले. अनेक दुचाकीस्वारांचा ताबा सुटल्याने किरकोळ अपघात झाले. चार वाजताच आकाश गडद झाल्यामुळे वाहनांचे दिवे सुरू असल्याचे रस्त्यावर दिसून आले.
डिलिव्हरी सेवा विस्कळित
पावसामुळे जेवण मागवणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. डिलिव्हरी बॉयला रस्त्यावरील खड्डे, पाणी आणि वाहतूक कोंडीतून वाट काढावी लागली. परिणामी, अनेक ऑर्डर्स विलंबाने पोहोचल्या किंवा रद्द झाल्या. ग्राहकांनी सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त केली, तर पावसाचा परिणाम बाजारपेठांवरही झाला. संततधार पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. परिणामी, शहरातील पदपथ व छोट्या दुकानांमध्ये वर्दळ घटली. अनेक ठिकाणी हातगाडीवाले व फेरीवाले आपली टपरी लावणे टाळून परत गेले.
वाहतूक कोंडीत भर
शहरातील लक्ष्मी रस्ता, कर्वे रस्ता, नवले पूल, सिंहगड रस्ता, हडपसर, डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, बाजीराव रस्ता आदी भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी वाहने रस्ता सोडून पादचारी मार्गावरून जाताना दिसली.
कॅब व रिक्षांचे दर वाढले
पावसामुळे सार्वजनिक वाहतूक अनियमित झाल्याने नागरिकांना कॅब आणि रिक्षांचा वापर करावा लागला. मात्र, या मागणीचा फायदा घेत अनेक चालकांनी दरात भरमसाट वाढ केली. १०-१५ मिनिटांच्या प्रवासासाठी दुप्पट दर आकारले गेले. नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
केवळ दोन दिवसांच्या पावसानेच पुणे शहराची यंत्रणा कोलमडल्याचे दिसून आले. यामुळे प्रशासनाची पूर्वतयारी व कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. नागरिकांनी शहरातील ड्रेनेज सिस्टीम, अपुरे रस्ते सुविधा आणि वाहतूक नियमन यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ‘‘महापालिका दरवर्षी पावसाळ्याआधी ड्रेनेज, रस्ते डागडुजीचे दावे करते, पण प्रत्यक्षात पावसाच्या पहिल्याच सरींमध्ये शहर तुंबते. हे सर्व कामे फक्त कागदावरच केली जातात का?’’ असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
झाडपडीच्या पाच घटना
शहरात झालेल्या पावसासह वादळी वाऱ्यांमुळे शहरातील एरंडवणे, हडपसर, लोहगाव, बुधवार पेठ, नवी पेठ या परिसरात झाडपडीच्या एकूण पाच घटना घडल्या, तर गंज पेठ येथे पावसामुळे ‘डीपी’मध्ये शॉटसर्किट झाले. या घटनांमध्ये कुठेही सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या सर्व ठिकाणी अग्निशामक दलाने तातडीने धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.