पुणे, ता. २७ : औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नागरस रोड व मेडिपॉईंट चौकात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका नोकरदारांसह विद्यार्थी व प्रवाशांना बसत आहे. तरीही हा प्रश्न सोडविण्याबाबत महापालिका व पोलिस प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची सद्यःस्थिती आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये ये-जा करण्यासाठी मुळा नदीवर असलेल्या औंधमधील राजीव गांधी पूल, महादजी शिंदे पूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाचा वापर होतो. पाषाण, बाणेर, बालेवाडी, औंध येथील नागरिक वाकड, हिंजवडी, पिंपळे निलख, काळेवाडी फाटा, सांगवी, पिंपरी-चिंचवडकडे ये-जा करण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. विशेषतः आयटी कंपन्या, रुग्णालये, गृहसंकुल, शाळा, उद्योग-व्यवसाय अशा विविध ठिकाणी लाखो नागरिक ये-जा करतात. त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी औंधमधील डॉ. आंबेडकर चौक, चंद्रनील चौक (मेडिपाईंट) व नागरस रोडजवळील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
परिहार चौक, आनंद पार्क सोसायटी, विधाते वस्ती येथून आंबेडकर चौकाकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यातच चौकाजवळ शाळेच्या बस, रिक्षा, हॉटेल्स, बॅंका, दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने आंबेडकर चौकातील रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होती. याचपद्धतीने नागरस रस्त्याजवळील चौकाजवळही रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात वाहने लावली जातात. त्यामुळे या ठिकाणीही वाहतूक कोंडीत भर पडते. मेडीपॉईंट चौकातही रहदारीच्यावेळी वाहतूक कोंडी होते. मोठ्या गृहप्रकल्पांच्या कामांमुळे दिवसेंदिवस वाढणारी अवजड वाहने, बेशिस्त वाहनचालकांबरोबरच सिग्नल व्यवस्था, वाहतूक पोलिस व वाहतूक वॉर्डनचा अभाव यांसारख्या विविध कारणांमुळे संबंधित चौकांमधील वाहतूक कोंडी वाढत आहे. ऐन रहदारीच्यावेळी वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागत असल्याचे चित्र दिसते. त्याचा सर्वाधिक फटका नोकरदार, प्रवासी, शाळा-खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांसह स्थानिक रहिवाशांना बसत आहे.
नागरस रोड, मेडिपॉईंट व डॉ. आंबेडकर चौकात दररोज सकाळी-संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. रस्त्यावरील अनधिकृत पार्कींगमुळे कोंडी वाढत जाते. ही कोंडी फोडण्यासाठी नो पार्किंगचे फलक, सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिस, वॉर्डन असावेत, अशा मागणी महापालिका, पोलिसांकडे केली आहे. तरीही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
- रमेश ठोसर, रहिवासी
आपले मत मांडा...
औंध परिसरात दररोजच वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका नागरिकांसह वाहनचालकांना बसत आहे. याकडे महापालिका आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत आपले मत मांडा..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.