पुणे, ता. २७ : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात फरार झालेला दीर आणि सासऱ्याला आश्रय दिल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी सुनावली. अटक केलेल्यांमध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम याचा समावेश आहे.
प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक), मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे (वय ६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) व राहुल दशरथ जाधव (वय ४५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर फरार झालेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील या पिता-पुत्राला आरोपींनी आश्रय दिला होता. दोघांनाही पोलिसांनी २२ मे रोजी अटक केली होती. पाचही आरोपींनी कर्नाटकातील एका रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणेसाठी बुकिंग केल्याचे उघड झाले आहे.
हगवणे यांना संबंधितांनी कोणती आर्थिक मदत केली आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, आरोपींना आश्रय देण्यासाठी इतर कोणी मदत केली का?, याचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. सुशीलकुमार पिसे, ॲड. कुंडलिक गावडे, ॲड. सचिन जाधव आणि ॲड. श्रीकांत पन्हाळे यांनी बाजू मांडली.
आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २४९ (ब) (अपराध्याला आसरा देणे) कलम लावले असून, ते जामीनपात्र आहे. अशा जामीनपात्र गुन्ह्यात आरोपींना अटक करताना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३१ नुसार नोटीस दिलेली नाही. मुख्य आरोपींवर लावलेली इतर कलमे या आरोपींना लागू होत नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी व जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.
नीलेश चव्हाण फरारच
वैष्णवी यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी नीलेश चव्हाण हा अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
बावधन पोलिसांवर ताशेरे
‘गुन्हेगाराला आश्रय देणे हा जामीनपात्र गुन्हा असतानाही, आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी कोणत्या आधारावर केली. पोलिसांना फक्त अटकेचे अधिकार आहेत का?,’ अशा शब्दांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी खंदारे यांनी बावधन पोलिसांवर ताशेरेही ओढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.