महिमा ठोंबरे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३१ : ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचे अमेरिकेतील विविध शहरांमध्ये होणारे प्रयोग... नाटकाचा सेट वैशिष्ट्यपूर्ण असल्याने प्रत्येक शहरात उभा करणे शक्य नाही. मग एकाच शहरात उभा केलेला सेट सगळ्या शहरांमध्ये फिरवायचे ठरते. पण विमा नसणे, सलग प्रवास नसणे यामुळे सेटची वाहतूक करणाऱ्या ट्रकसाठी चालकच मिळेना. अखेर या प्रयोगांचे अमेरिकेत आयोजन करणारे शैलेश शेट्ये यांनीच सारथ्य करायचे ठरवले आणि २४ दिवसांच्या या दौऱ्यात नाटकाचा सेट असलेला हा ट्रक १० शहरांमधून तब्बल साडेआठ हजार किलोमीटर स्वतः चालवत घेऊन गेले.
मराठी माणसांच्या रंगभूमीवरील प्रेम आणि ध्यासाची प्रचिती महाराष्ट्रात तर नेहमीच येत असते. मात्र शेट्ये यांच्या निमित्ताने सातासमुद्रापार अमेरिकेतही याच नाट्यध्यासाचे उदाहरण पाहायला मिळाले. त्यांच्या या जिद्दीमुळेच ‘वाडा चिरेबंदी’ या अभिजात नाटकाचे प्रयोग त्याच्या मूळ नेपथ्यासह अतिशय देखणेपणाने अमेरिकेतील रसिकांसमोर सादर झाले.
लॉस एंजेलिस येथे राहाणारे शेट्ये यांनी त्यांच्या ‘फाइव्ह डायमेन्शन’ या संस्थेतर्फे या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत आयोजित केले होते. अमेरिकेत होणाऱ्या विविध मराठी नाटकांचे नेपथ्य तेथील स्थानिक नाट्यगृहांतील साहित्याच्या मदतीने तयार होत असते. मात्र ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाबाबत ही गोष्ट कठीण होती, ती त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्यामुळे. नाटकातील अन्य पात्रांइतकाच महत्त्वाचा असलेला हा वाडा हुबेहूब उभा केल्याशिवाय या नाटकाची परिपूर्ण अनुभूती रसिकांना आली नसती.
त्यामुळेच शेट्ये यांनी नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांच्याशी चर्चा करून कल्पकपणे उपलब्ध साहित्यातून हुबेहूब नेपथ्य तयार केले. मात्र हे नेपथ्य संपूर्णपणे उभे करायला सात-आठ तास लागत असल्याने नेपथ्याचे साहित्य जसेच्या तसे सर्वत्र नेण्याचे ठरवले. अशा खासगी प्रवासासाठी स्वतंत्र विमा उतरवला जात नसल्याने अमेरिकेतील चालकांनी या ट्रकच्या प्रवासाला नकार दिला. त्यामुळे मग वाहने चालविण्याची आवड असणाऱ्या शेट्ये यांनी स्वतःच त्याचे सारथ्य केले. या संपूर्ण दौऱ्यात त्यांचे सहकारी प्रमोद पाटील, तसेच प्रत्येक शहरातील स्थानिक मंडळांनीही सहकार्य केले.
२२५३ किलोमीटर, सलग २१ तास
या ट्रकच्या प्रवासातील सर्वांत आव्हानात्मक टप्पा होता, तो डलास ते लॉस एंजेलिस या शहरांचा. कारण डलास येथील प्रयोग झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी लॉस एंजेलिस येथील प्रयोग होता. त्यामुळे शैलेश शेट्ये यांनी हे २२५३ किलोमीटरचे अंतर सलग २१ तास न थांबता ट्रक चालवून पार केले.
ज्या दर्जाचा नाट्यप्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होतो, त्याच दर्जाचा प्रयोग अमेरिकेतही प्रत्येक ठिकाणी सादर व्हावा, ही माझी इच्छा होती. त्यासाठी ही सर्व धडपड केली. अमेरिकेत गुजराती, पंजाबी भाषिकांचे अस्तित्त्व ठळक आहे. मराठी भाषिकांचेही अस्तित्व ठळक व्हावे, यासाठी मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे.
- शैलेश शेट्ये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.