पुणे, ता. १३ : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उपलब्ध प्रवेशाच्या राज्यातील एकूण जागांपैकी आतापर्यंत ८३.७० टक्के जागांवर, तर पुणे जिल्ह्यातील ७३.८० टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. राज्यातील १६.३० टक्के आणि पुणे जिल्ह्यातील २६.२० टक्के जागा अद्याप रिक्त आहेत. या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी शनिवारपर्यंत (ता. २०) मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील एक लाख ५० हजार ४४८ जागांवर आतापर्यंत एक लाख २५ हजार ९४० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यात एक लाख चार हजार ३०९ विद्यार्थी आणि २१ हजार ६३० विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे शासकीय आणि खासगी आयटीआयच्या ऑगस्ट सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे करण्यात येत आहेत. याअंतर्गत आतापर्यंत दिलेल्या मुदतीत अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी २० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. नव्याने आलेले अर्ज आणि यापूर्वी सादर झालेले अर्ज याची एकत्रित गुणवत्ता यादी २१ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. ही फेरी २१ सप्टेंबरला सुरू होईल, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक माधवी सरदेशमुख यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
सर्वाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले ट्रेड
ट्रेड : प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
इलेक्ट्रिशियन : २३,३८१
फिटर : १५,४५१
वेल्डर : १२,९९७
कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट : ८,४२१
मेकॅनिक डिझेल : ६,५०१
वायरमन : ६,३११
मेकॅनिक मोटर व्हेईकल : ५,८१०
ड्रेस मेकिंग : ३,६६८
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : ३,६२९
टर्नर : २,९५५
राज्यातील आकडेवारी
४१८
- शासकीय आयटीआय
५८४
- खासगी आयटीआय
१,५०,४४८
- एकूण प्रवेश क्षमता
१,२५,९४०
- आतापर्यंत झालेले प्रवेश
- एकूण ट्रेड : १०६
पुणे जिल्ह्यातील आकडेवारी
१०,७७२
- प्रवेशाच्या जागा
७,९५१
- आतापर्यंत झालेले प्रवेश
६,९९६
- प्रवेश घेतलेले विद्यार्थी
९५५
- प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनी
सध्या आयटीआय प्रवेशात वेल्डर, मेकॅनिस्ट, मेकॅनिस्ट ग्राइंडर, टूल ॲण्ड डाय मेकर, वुडवर्क टेक्निशियन, टर्नर, शीट मेटल वर्कर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर अशा ट्रेडस्मध्ये प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर यात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने मोठ्या संधी आहेत. औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एक हजार ६६४ जागा असून, त्यातील एक हजार ३६८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता २९६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
- सचिन धुमाळ,
उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, पुणे
‘आयटीआय’ प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक
कालावधी : तपशील
- २० सप्टेंबरपर्यंत : नव्याने ऑनलाइन अर्ज करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे आणि अर्ज निश्चित करणे
- २१ सप्टेंबर : एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर करणे
- २१ सप्टेंबर : संस्थास्तरीय समुपदेशन फेरी
- ३० सप्टेंबरपर्यंत : संस्थास्तरीय समुपदेशन फेरीत प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी हजर राहावे आणि उपलब्ध जागांवर प्रवेश निश्चित करणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.